आयपीएलच्या तेराव्या हंगामाला काही दिवसांमध्येच युएईत सुरुवात होईल. १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील सामन्याने तेराव्या हंगामाची सुरुवात होईल. परंतू भारतासोबतच अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंना अनेकदा आयपीएल लिलावात बोली लागत नाही. चेतेश्वर पुजारा हा देखील अशाच फलंदाजांपैकी एक. भारतीय कसोटी संघाचा पुजारा हा कणा मानला जातो. राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर त्याने कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकाची जागा खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली आहे. परंतू गेल्या काही वर्षांमध्ये आयपीएलमध्ये त्याच्यावर कधीच बोली लागलेली नाही. परंतू लिलावात बोली लागत नाही याचं आपल्याला कधीही वाईट वाटलं नाही असं पुजाराने स्पष्ट केलंय.

“एक क्रिकेटपटू म्हणून माझ्यावर बोली लागली नाही याचं मी वाईट वाटून घेऊ शकत नाही. आयपीएलमध्ये लिलाव आणि खेळाडूंची निवड करणं किती कठीण असतं हे मला माहिती आहे, त्यामुळे मला या गोष्टीचं कधी वाईट वाटलं नाही. हाशिम आमलासारख्या दिग्गज खेळाडूला आयपीएलमध्ये बोली न लागल्यामुळे माघारी परतावं लागलं आहे. याव्यतिरीक्त टी-२० क्रिकेट खेळणारे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्यावर बोली लागत नाही. त्यामुळे माझ्यावर कोणी बोली लावत नाही याचं मला कधी वाईट वाटत नाही. पण संधी मिळाल्यास मला आयपीएलमध्ये खेळायला नक्की आवडेल.” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पुजारा बोलत होता.

यावेळी बोलत असताना आपली कसोटी खेळणारा खेळाडू ही तयार झालेली प्रतिमा आपल्यासाठी मारक ठरल्याचंही पुजाराने कबूल केलं. “होय, खरं आहे कसोटी खेळणारा खेळाडू अशी माझी ओळख तयार केली गेली आणि आता मी त्यासाठी काही करु शकत नाही. मी नेहमी म्हणत आलोय की मला संधी मिळायला हवी. ज्यावेळी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये मला संधी मिळेल त्याच वेळी मी स्वतःला सिद्ध करु शकतो. अ श्रेणीच्या क्रिकेट सामन्यांमध्ये माझी कामगिरी चांगली राहिलेली आहे. मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत मी खेळलो आहे, इंग्लंडमध्ये List A क्रिकेटमध्येही मी आश्वासक कामगिरी केली आहे. त्यामुळे संधीची वाट पाहणं हे एवढंच माझ्या हातात आहे.”