करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभरात भीतीचं वातावरण आहे. मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बंगळुरु अशा अनेक महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण सापडत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र आणि संबंधित राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक राज्य सरकारने कलम १४४ लागू केलेलं आहे. यामुळे नेहमी गर्दीने भरलेले रस्ते आता अचानक निर्मनुष्य दिसत आहेत. अनेक उद्योगधद्यांनाही याचा फटका बसला आहे. भारतीय क्रीडा विश्वालाही करोनाचा फटका बसला आहे.

बीसीसीआय सह अन्य महत्वाच्या क्रीडा संघटनांनी आपल्या महत्वाच्या स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द केल्या आहेत. बीसीसीआयने आपल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने कोलकाता शहराचे निर्मनुष्य फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत…हे दिवसही जातील…आपण सर्वांनी सकारात्मक राहुया असा आशावाद व्यक्त केला आहे.

२९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता बीसीसीआय आयपीएल स्पर्धा रद्द करण्याची शक्यता आहे. मध्यंतरी बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचं आयोजन करण्याचा विचार करत असल्याची बातमी समोर आली होती. मात्र आयसीसीचं कॅलेंडर पाहता हा पर्यायही उपलब्ध नसल्याचं बीसीसीआय अधिकाऱ्याने स्पष्ट केलंय. मे महिन्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. याचसोबत यंदा आशिया चषकाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती पाहता यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द होण्याची शक्यता असल्याचं बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितलं.