ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत 2-0 ने आघाडी घेतल्यानंतरही, भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलिया अखेरच्या 3 वन-डे सामन्यात बाजी मारत भारताला घरच्या मैदानावर पराभवाचं पाणी पाजलं. अखेरच्या दोन वन-डे सामन्यांसाठी भारतीय संघाने महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देऊन ऋषभ पंतला यष्टीरक्षणची संधी दिली. मात्र ढिसाळ यष्टीरक्षणासोबत पंतला फलंदाजीतही आपली छाप पाडता आलेली नाही. ज्यावरुन त्याला टीकेचं धनीही व्हायला लागलं होतं. यावरुन ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने, धोनीला कमी लेखू नका असा सल्ला टीम इंडियाला दिला आहे.

अखेरच्या सामन्यानंतर ट्विटरवर चाहत्यांमध्ये धोनीच्या संघातील स्थानावर चर्चा सुरु झाली. यातील एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, क्लार्कने धोनीचा अनुभव हा भारताला मधल्या फळीत महत्वाचा असल्याचं म्हटलं आहे.

टी-20 मालिका 2-0 ने गमावल्यानंतर भारताला वन-डे मालिकेतही 3-2 ने पराभवाचा सामना करावा लागला. 30 मे पासून सुरु होणाऱ्या वन-डे विश्वचषकाआधी भारतीय संघाची ही अखेरची वन-डे मालिका होती. यानंतर भारतीय खेळाडू 23 मार्चपासून आयपीएलमध्ये सहभागी होतील. त्यामुळे विश्वचषकासाठीच्या संघात कोणता खेळाडू आपलं स्थान पक्क करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – मालिका पराभवानंतर विराटचा सहकाऱ्यांना सल्ला, आयपीएलची मजा घ्या !