प्रशांत केणी

क्रिकेट इतिहासातील दोन क्षण भारतीयांना भविष्यातही सदैव प्रेरणादायी ठरत राहतील. हे दोन्ही क्षण इंग्लंडमधील लॉर्ड्सशी नाते सांगणारे आहेत. यापैकी पहिली घटना म्हणजे कपिल देवने उंचावलेला विश्वचषक आणि दुसरी घटना म्हणजे २००२मध्ये सौरव गांगुलीने नॅटवेस्ट चषक जिंकल्यानंतर अँड्रय़ू फ्लिंटॉफचा बदला घेण्याच्या इराद्याने लॉर्ड्सवर जर्सी काढून गरागरा फिरवली होती.

याच गांगुलीने मग ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉ याला नाणेफेकीसाठी तिष्ठवले होते. भारतीय क्रिकेटचा स्वाभिमान दाखवणाऱ्या अशा अनेक घटना या गांगुलीशी निगडित आहेत. त्यामुळेच बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) सूत्रे स्वीकारणाऱ्या गांगुलीकडे मोठय़ा आशेने पाहिले जात आहे.

गांगुलीच्या लॉर्ड्समधील घटनेबाबत नंतर जेफ्री बॉयकॉट यांनी त्याला विचारले होते की, ‘‘लॉर्ड्सवर तू केलेल्या कृत्याचे तुला कारण द्यावे लागेल.’’ याबाबत गांगुली उत्तरला, ‘‘तुमच्या एका खेळाडूने अशाच प्रकारचे कृत्य मुंबईत केले होते.’’ यावर बॉयकॉट तोऱ्यात म्हणाले, ‘‘हो, पण लॉर्ड्स ही क्रिकेटची पंढरी आहे!’’ पण तितक्याच आवेशात गांगुलीने त्याला प्रत्युत्तर दिले की, ‘‘लॉर्ड्स ही तुमची क्रिकेटची पंढरी आहे, तर वानखेडे ही आमची आहे.’’ आखूड टप्प्याचा चेंडू जोरात उसळावा आणि वेगाने अंगावर यावा, तशीच काहीशी अवस्था बॉयकॉटची झाली होती.

गांगुलीने आंतरराष्ट्रीय पदार्पणात फक्त तीन धावा केल्या होत्या. या सुरुवातीच्या काळात संघातील स्थानासाठी झगडताना त्याचा गर्विष्ठ स्वभावसुद्धा अनेकदा आड येत होता. परंतु कालांतराने स्वभावातील हाच कडवेपणा त्याचे सामथ्र्य झाले. भारतीय क्रिकेटमध्ये स्थिरावल्यानंतर आक्रमक नेतृत्व आणि स्पष्टवक्तेपणातून तो अनेकदा अधोरेखित होत राहिला. एकदा गांगुलीला खिजवण्यासाठी रवी शास्त्री यांनी ‘‘ईडन गार्डन्स स्टेडियमवर तुझा साधा स्टॅण्ड नाही?’’ अशी चेष्टा केली. पण गांगुलीने त्याला निरुत्तर करताना म्हटले की, ‘‘हे संपूर्ण स्टेडियमच माझे आहे!’’

२००५मध्ये प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्याशी गांगुलीचे मतभेद चव्हाटय़ावर आले होते. संघ अपयशातून मार्गक्रमण करीत असतानाच चॅपेल यांनी ‘बीसीसीआय’ला ‘ई-मेल’द्वारे कळवले होते की, गांगुली हा भारताचे नेतृत्व करण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा अयोग्य आहे. तसेच तो संघात ‘फोडा आणि राज्य करा’ हे धोरण राबवत आहे. या घटनेनंतर गांगुलीचे कर्णधारपद गेले. परंतु त्यानंतर त्याने झोकात पुनरागमन केले. सक्षम नेतृत्वाचेही दाखले दिले.

सध्या भारतीय क्रिकेटची प्रतीमा सुधारण्याचे शिवधनुष्य पुढील नऊ महिन्यांच्या कालावधीसाठी तरी गांगुलीला पेलायचे आहे. लोढा समितीच्या सुधारणावादी धोरणांमुळे क्रिकेटमध्ये परिवर्तनाचे वारे वाहत असतानाच एक माजी आंतरराष्ट्रीय कर्णधाराकडे सूत्रे जाणे हे सकारात्मक मानले जात आहे. लोढा समितीच्या शिफारशींमधील त्रुटींमुळे घराणेशाहीला शिरसावंद्य मानत अनेक संघटकांनी आपल्या नातलगांना किंवा विश्वासू व्यक्तीला संघटनेवर पदाधिकारी केल्याचे ‘बीसीसीआय’ आणि मुंबईसहित अनेक राज्य संघटनांच्या निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. न्यायालयाने हकालपट्टी केलेले एन. श्रीनिवासन आणि अनुराग ठाकूर यांचे भारतीय क्रिकेटवरील नियंत्रण अद्याप कायम आहे. ठाकूर हे क्रिकेट प्रशासनावरील भाजपच्या वर्चस्वासाठी देशव्यापी संघटनात्मक व्यूहरचना आखतात. त्यातूनच गांगुली हे नाव सर्वसंमतीने निश्चित करण्यात आले. त्यामुळे भारतीय क्रिकेटला दिशा देतानाच या भारतीय क्रिकेट नियंत्रक मंडळाला जपण्याचे आव्हानसुद्धा असणार आहे. कोलकातामधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आव्हान देण्यासाठी गांगुलीला भाजपचा चेहरा बनवण्याचे प्रयत्नसुद्धा बराच काळ चालू आहेत.

संयुक्त सचिव म्हणून बंगाल क्रिकेट संघटनेच्या संघटनात्मक कार्याला गांगुलीने प्रारंभ केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा निर्माण करणाऱ्या जगमोहन दालमिया यांच्या या कार्यक्षेत्रात २०१५मध्ये तो अध्यक्ष झाला. गेल्या चार वर्षांच्या कालखंडात क्रिकेट आणि क्रिकेटपटूंच्या हितासाठी पुरस्कर्त्यांकडून क्रिकेटसाठी निधी आणणे, ईडन गार्डन्सवर चाहत्यांना सुविधा उपलब्ध करणे, पुरुष-महिला संघाचा दर्जा उंचावणे अशा अनेक योजना त्याने राबवल्या. याचप्रमाणे पावसाचे आव्हान पेलणारे मैदानावरील आच्छादन खरेदी केल्यामुळे २०१६च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकामधील भारत-पाकिस्तान सामना होऊ शकला.

अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्याआधीच गांगुलीची फटकेबाजी मात्र सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) नफ्यातील हिश्श्याबाबत त्याने जाब विचारणे, महेंद्रसिंह धोनीच्या भवितव्याबाबत निवड समितीशी चर्चा करणे, २०२०च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघबांधणी करणे, क्रिकेटपटूंना अडचणीचा ठरणारा दुहेरी हितसंबंधांचा नियम, अशा अनेक आव्हानांची जंत्री गांगुलीपुढे आहे. त्यामुळे गांगुलीसाठी ही ‘कसोटी’च ठरणार आहे.

prashant.keni@expressindia.com