भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना आज

भारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका

इंग्लंडमध्ये मे महिन्यात रंगणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत काही जागांची निश्चिती करण्याची भारतीय संघासमोर ही शेवटची संधी आहे. मात्र मायदेशात रंगणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत भारताचा खेळाडूंच्या अचूक निवडी तसेच दुखापती यांसारख्या नव्या आव्हानांचाही सामना करावा लागणार आहे.

ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यात दोन ट्वेन्टी-२० आणि पाच एकदिवसीय सामने खेळणार असून त्यापैकी पहिला ट्वेन्टी-२० सामना रविवारी विशाखापट्टणम येथे रंगणार आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री या दोनच जागांची निश्चिती अद्याप झाली असली तरी उर्वरित जागांच्या निवडीवर याच मालिकेद्वारे शिक्कामोर्तब होणार आहे.

कर्णधार कोहलीला तीन आठवडय़ांची विश्रांती मिळाली असली तरी ऋषभ पंत आणि विजय शंकर या दोन खेळाडूंच्या कामगिरीकडे कोहलीच्या नजरा लागल्या आहेत. विश्वचषक संघात स्थान मिळवण्यासाठी हे दोघेही खेळाडू उत्सुक आहेत. दिनेश कार्तिक विश्वचषकाच्या संघाच्या शर्यतीतून काहीसा मागे पडला असला तरी ऋषभ पंतला आणखीन संधी दिली जाणार आहे. हार्दिक पंडय़ा पाठीच्या दुखापतीतून सावरत असल्यामुळे विजय शंकरला विश्वचषकासाठीच्या संघातील आपले स्थान भक्कम करण्याची हीच सुवर्णसंधी असेल.

आक्रमक फलंदाजी करत विजय शंकरने आपली गुणवत्ता दाखवून दिली असली तरी गोलंदाजीत तो फारसा प्रभावी ठरलेला नाही. त्यामुळे संघातील स्थान पक्के करण्यासाठी त्याला गोलंदाजीतही चमक दाखवावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आलेल्या दिनेश कार्तिकसाठी मात्र आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची ही शेवटची संधी असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या निर्णायक ट्वेन्टी-२० सामन्यात भारताला अवघ्या ४ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्या वेळी एकेरी धाव नाकारण्याची चूक कार्तिकला महागात पडली आहे. भारताचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराच्या आगमनामुळे यजमानांची गोलंदाजी अधिक बळकट झाली आहे.

२०१८ साली आयसीसीच्या पुरस्कारांवर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या कोहलीने ३८ सामन्यांत २७३५ धावा केल्या होत्या. १४ एकदिवसीय सामन्यांमध्ये सहा शतके आणि तीन अर्धशतकांसह त्याने १२०२ धावा कुटल्या होत्या.

दुसरीकडे आरोन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघ तीन महिन्यांनंतर ट्वेन्टी-२० मालिका खेळत आहे. या वेळेला ऑस्ट्रेलिया संघात बिश बॅश लीग खेळणाऱ्या सहा खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या डी’आर्सी शॉर्टने १५ सामन्यांत ६३७ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर सर्वाधिक बळी मिळवणारा केन रिचर्डसन हासुद्धा भारतातील फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टय़ांवर चमकदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे.

१७ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत १७ ट्वेन्टी-२० सामने झाले असून ११ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाला फक्त  सहा सामने जिंकता आले आहेत.

भारतात उभय संघांमध्ये आतापर्यंत पाच सामने खेळवण्यात आले असून त्यापैकी ४ सामन्यांत भारताने बाजी मारली आहे. पाहुण्या संघाला फक्त  एकच सामना जिंकता आला आहे.

संघ भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, कृणाल पंडय़ा, विजय शंकर, यजुर्वेद्र चहल, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, मयांक मरकडे.

ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), डी’आर्सी शॉर्ट, पॅट कमिन्स, अ‍ॅलेक्स कॅरे, जेसन बेहरेनडॉर्फ, नॅथन कोल्टिएल-नील, पीटर हँडस्कॉम्ब, उस्मान ख्वाजा, नॅथन लिऑन, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, मार्कस स्टॉइनिस, अ‍ॅश्टन टर्नर, अ‍ॅडम झाम्पा.

* सामन्याची वेळ : संध्याकाळी ७ पासून

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-१