क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या शिवछत्रपती या सर्वोच्च क्रीडा पुरस्काराचे निकष आणि कार्यपद्धती सुधारण्यासाठी तसेच या पुरस्कारांसाठी सर्व खेळांचा समावेश करण्यासाठी माजी ऑलिम्पियन धनराज पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री आशीष शेलार यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली.

पद्मश्री पुरस्कारप्राप्त धनराज यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, जलतरण सहसंचालक जयप्रकाश दुबळे, योगप्रशिक्षक अरुण खोडसकर, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे, जिम्नॅस्टिक्सच्या आंतरराष्ट्रीय पंच वर्षां उपाध्ये, गिर्यारोहक प्रशिक्षक ऋषिकेश यादव, पॅरा-ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष राजाराम घाग, बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड, अर्जुन पुरस्कार विजेती नेमबाज तेजस्विनी सावंत आणि विशेष निमंत्रित म्हणून मनोहर साळवी यांचा समावेश आहे.

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी राज्य सरकारकडून शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात यावे. या पुरस्कारांमध्ये ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धेव्यतिरिक्त अन्य खेळांचाही समावेश व्हावा, अशी मागणी होत होती. आतापर्यंत ३९ क्रीडाप्रकारांतील खेळाडूंचा पुरस्कारासाठी विचार केला जात होता. त्यात वाढ करून हे पुरस्कार सर्वसमावेशक असावेत, अशी क्रीडाप्रेमींची मागणी होती. अनेक बाबतीत सरकारकडे सूचना येत होत्या. पॅरालिम्पिक प्रकारांचाही शिवछत्रपती पुरस्कारांमध्ये समावेश करण्यात यावा, अशीही मागणी होत होती. या सर्व बाबी विचारात घेऊन क्रीडामंत्र्यांनी तज्ज्ञांची समिती गठित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती येत्या १५ दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे.