भ्रष्टाचाराच्या  घोटाळ्याप्रकरणी सर्व बाजूंनी दडपण आल्यामुळे सेप ब्लाटर यांनी फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन अर्थात फिफाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी भारतीय वंशाचे अमेरिकेच्या सुनील गुलाटी यांचे नाव चर्चेत आहे. पृथ्वीवरचा सगळ्यात लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलचे नियंत्रण करणाऱ्या फिफाच्या अध्यक्षपदासाठी गुलाटी यांच्यासह अनेक मोठी नावे चर्चेत आहेत. या सगळ्यांना मागे टाकत सुनील यांची अध्यक्षपदी वर्णी लागल्यास भारतीय वंशाचा माणूस शक्तिशाली फिफाच्या प्रमुखपदी विराजमान होऊ शकतो.
अमेरिकन सॉकर महासंघाचे अध्यक्ष म्हणून गुलाटी सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. अमेरिकेत अन्य k02खेळांच्या भाऊगर्दीत फुटबॉलचा प्रसार करण्याचे श्रेय ५५ वर्षीय गुलाटी यांना जाते. फुटबॉल विश्वाला हादरवून टाकणाऱ्या घोटाळ्याप्रकरणी अमेरिकेच्या पुढाकारानंतरच स्वित्र्झलड पोलिसांनी चौदा फिफा अधिकाऱ्यांना अटक केली होती. फिफावर अंकुश ठेवण्यासाठीच्या अमेरिकेच्या प्रयत्नात गुलाटी निर्णायक ठरू शकतात.
‘फिफा आणि खेळाच्या विकासासाठी ब्लाटर यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा हे स्वागतार्ह पाऊल आहे. फिफा संघटनेतील अनिष्ट चालिरीतींच्या निर्मूलनासाठीच्या प्रयत्नांचा हा पहिला टप्पा आहे. ब्लाटर यांचा राजीनामा हे सकारात्मक बदलासाठी आशादायी चित्र आहे. जगभरातील फुटबॉल चाहत्यांना समाधान देणारी ही घटना आहे’, असे गुलाटी यांनी सांगितले.
भ्रष्टाचाराच्या घोटाळ्याप्रकरणी अटकसत्र झाल्यानंतरही फिफा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. त्यावेळी गुलाटी यांनी ब्लाटर यांच्याविरुद्ध उभे असलेल्या प्रिन्स अली बिन हुसेन यांना पाठिंबा दिला होता. गुलाटी आणि पर्यायाने अमेरिकेचा ब्लाटर यांना विरोध आहे. ब्लाटर यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाचे सर्व पर्याय खुले झाल्याने गुलाटी यांच्या नावाला वलय प्राप्त झाले आहे.
दरम्यान, युरोपियन फुटबॉल महासंघाचे (यूएफा) अध्यक्ष मिचल प्लॅटिनी, ब्लाटर यांच्याविरोधात अध्यक्षपदासाठी उभे राहिलेले प्रिन्स अली बिन अल हुसेन आणि पोर्तुगालचे दिग्गज फुटबॉलपटू लुईस फिगो ही नावे फिफाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आली आहेत.    ‘‘फिफाच्या नवीन अध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीला थोडासा वेळ लागेल,’’ अशी माहिती फिफाच्या कार्यकारी सदस्याने दिली.
फ्रेंच फुटबॉलपटू आणि राजकारणी प्लॅटिनी यांच्याकडे संभाव्य अध्यक्ष म्हणून पाहिले जात आहे. ५९ वर्षीय प्लॅटिनी यांनी तीन वेळा बॅलॉन डी’ओर हा मानाचा पुरस्कार पटकावला असून प्रशासक म्हणून त्यांनी १९९८च्या विश्वचषकाचे यशस्वी आयोजन करून स्वत:ला सिद्ध केले आहे. मात्र ब्लाटर यांच्याविरोधात न लढण्याचा निर्णय त्यांनी गतवर्षी केला होता, परंतु २०१९ मध्ये ते या शर्यतीत उतरण्याच्या तयारीत होते. ब्लाटर यांच्या अचानक राजीनामा देण्याच्या निर्णयावर त्यांनी ‘कठीण’ आणि ‘धाडसी’ अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र त्यांनी स्वत: अध्यक्षपदासाठी उत्सुक असल्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत.
जॉर्डनचे प्रिन्स अली यांनी गतआठवडय़ात झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ब्लाटर यांच्याविरोधात दंड थोपटले होते. त्यांना पराभव पत्करावा लागला असला, तरी आता ते पुन्हा या पदासाठी इच्छुकता दर्शवू शकतात. ‘‘नवीन निवडणुकीसाठी प्रिन्स अली तयार आहेत,’’ अशी प्रतिक्रिया जॉर्डन फुटबॉल महासंघाचे उपाध्यक्ष सॅला साब्रा यांनी दिली.
निवडणुका होईपर्यंत ब्लाटर यांनी कार्यालयात हजर राहण्याची तयारी दर्शवली आहे, परंतु फिफा कार्यकारिणीचे विशेष अधिवेशन डिसेंबर २०१५ आणि मार्च २०१६ या कालावधीत होणे अपेक्षित आहे. तोपर्यंत ब्लाटरच कारभार पाहतील. अध्यक्षपदासाठी फिगो यांना पोर्तुगीज संघटनांचा पाठिंबा आहे. डच फुटबॉल संघटनेचे प्रमुख मिचल व्ॉन प्राग यांनी यूएफासोबत बैठकीनंतर निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

आशिया, आफ्रिकेतून पर्याय..
ब्लाटर यांना पाठिंबा दर्शविणाऱ्या आशिया आणि आफ्रिकन संघटना अध्यक्षपदासाठी उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे (ओसीए) प्रमुख शेख अहमद अल-फहाद अल-सबाह हे नुकतेच फिफा कार्यकारिणी सदस्य झाले आहेत. त्यांना अध्यक्षपदासाठी उभे राहायचे असल्यास त्यांनी ओसीए किंवा फिफा यापैकी एक पर्याय निवडावा लागेल. आशियाई फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष शेख सलमान बिन इब्राहिम अल खालिफा हेही शर्यतीत आहेत. आफ्रिकन फुटबॉल महासंघाचे प्रमुख इसाय हायातोउ हे २००२ साली ब्लाटर यांच्या विरोधात उभे राहिले होते.

ब्राझीलचे दिग्गज झिकोही शर्यतीत?
रिओ दी जेनेइरो : फिफा अध्यक्षपदासाठी ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू झिको यांचे नाव पुढे येत आहे. तीन विश्वचषक स्पध्रेत ब्राझील संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या झिको यांनी अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले नसले तरी तसे संकेत त्यांनी दिले आहेत. ते म्हणाले, ‘‘फुटबॉलसाठी मी आयुष्य अर्पण केले आहे.  राजकारणाआधी फुटबॉल आले आहे. सध्या मला कुणाचाही पाठिंबा नाही, परंतु दरवाजे उघडे आहेत. मीही उमेदवार बनू शकतो. ही केवळ कल्पना आहे. कोण जाणे पुढे काय होईल?’’   झिको सध्या भारतातील एफसी गोवा क्लबचे प्रशिक्षक आहेत.

ब्लाटर यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा
फिफाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सेप ब्लाटर यांच्यामागे फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचा (एफबीआय) ससेमिरा लागला आहे. एफबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले, एफबीआयचे संचालक जेम्स कोमी व महाअभिवक्ता लोरेटा लिंच यांनी आर्थिक गैरव्यवहाराबाबत फिफाच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी केली जात असल्याचे नुकतेच जाहीर केले होते. ब्लाटर हेदेखील त्यामधून सुटणार नाहीत. अनेक पदाधिकारी आपण निदरेष कसे आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी काही पदाधिकारी ब्लाटर यांनाच लक्ष्य करीत आहेत. अर्थात फिफा संघटना कोलमडून टाकली जाईल अशी कोणाची इच्छा नाही मात्र गैरव्यवहाराच्या आरोपातून संघटनेची प्रतिमा कशी सुधारली जाईल याचा काही जण विचार करीत असावेत.

यूएफाने बोलावलेली बैठक रद्द
फिफाचे अध्यक्ष सेप ब्लाटर यांच्याविरोधात रणनीती आखण्यासाठी युरोपियन फुटबॉल महासंघाने (यूएफा) बोलावलेली बैठक ब्लाटर यांच्या राजीनाम्यानंतर रद्द करण्यात आली आहे. यूएफाचे अध्यक्ष मिचल प्लॅटिनी म्हणाले, ‘‘ब्लाटर यांच्या राजीनाम्यानंतर पुढील घडामोडींपर्यंत वाट पाहणे योग्य ठरेल.’’ प्लॅटिनी यांनी अमेरिकन तपास यंत्रणेच्या कारवाईवर अंदाज व्यक्त करणे कठीण असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘प्रत्येक दिवशी नवीन माहिती समोर येत आहे आणि त्यामुळे परिस्थितीचे योग्य मूल्यांकन करण्यासाठी अधिक काळ लागेल.’’  

माजी फिफा पदाधिकारी इंटरपोलच्या रडारवर
जॅक वॉर्नर आणि निकोलस लिओझ हे फिफाचे माजी पदाधिकारी इंटरपोलच्या रडारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. क्रीडा विपणन कंपन्यांच्या प्रमुखांकडेही इंटरपोलचे लक्ष आहे. त्रिनिदाद अ‍ॅण्ड टोबॅगो स्थित वॉर्नर फिफाचे माजी उपाध्यक्ष आहेत, तर पॅराग्वेस्थित लिओझ फिफाच्या कार्यकारिणीचे सदस्य होते.

फि फाला प्रामाणिक व्यक्तीची आवश्यकता – पेले
भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपांमुळे फिफाची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रामाणिक व्यक्तीची आवश्यकता असल्याचे मत ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांनी व्यक्त केले आहे. ‘‘आयुष्यात बदल होतच राहतात, फुटबॉलमध्येही होत गेले. फिफासारख्या संघटनांमध्ये प्रामणिक आणि चांगली माणसे येणे अधिक महत्त्वाचे आहे.’’ १९५२, १९६२ आणि १९७० च्या फुटबॉल विश्वचषक विजेत्या ब्राझील संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या पेले यांनी फिफामध्ये चाललेल्या भ्रष्टाराचाराने आपण व्यथित नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘भांडण विसरून सर्वाना एकत्र काम करताना बघायला आवडेल. मी एक खेळाडू आहे आणि त्यामुळे संघटनेमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराशी मला घेणेदेणे नाही.’’

ब्लाटर यांच्या निर्णयाचे ह्य़ुंदायकडून स्वागत
फिफाच्या प्रायोजकांपैकी एक ह्य़ुंदाय मोटर कंपनीने सेप ब्लाटर यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाचे स्वागत केले. भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे फिफाची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याच्या दिशेने हे सकारात्मक पाऊल असल्याचे ह्य़ुंदायने स्पष्ट  केले.