सिद्धार्थ खांडेकर – response.lokprabha@expressindia.com

मुलूखमैदान

आजवरचे ११ दिवस-रात्र कसोटी सामने उन्हाळ्यात खेळवले गेले. दोन सामने दुबईत खेळवले गेले, जिथे हिवाळा थंड नसतो. भारतातील हा सामना हिवाळ्यात खेळवला जात आहे. या ऋतूमध्ये मोठय़ा प्रमाणात दव जमा होते. सायंकाळी अशा प्रकारच्या दवामुळे चेंडू जड होतो आणि त्यावर नीट पकडही घेता येत नाही. त्यामुळे फलंदाजांचा फायदा होतो. सचिन तेंडुलकरने दिवस-रात्र सामन्याबाबत पहिली प्रतिक्रिया देताना दवाचाच उल्लेख केला.

दिवस-रात्र कसोटी सामने खेळणाऱ्या संघांच्या पंक्तीत दाखल होणारे भारत आणि बांगलादेश हे शेवटचे देश ठरतात. येत्या २२ नोव्हेंबर रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर भारताचा, भारतातील आणि बांगलादेशचा पहिलावहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळवला जाईल. माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर त्याने उचललेले हे पहिले महत्त्वाचे पाऊल मानावे लागेल. सौरवने हा सामना खेळवण्याविषयी बांगलादेश क्रिकेट मंडळाला (बीसीबी) विनंती केली होती. सौरव आणि बीसीबीचे सौहार्दाचे संबंध असल्यामुळे ही विनंती तत्काळ मान्यही झाली. क्रिकेटमधील कोणतेही बदल भारत चटकन स्वीकारत नाही, हा इतिहास आहे. एकदिवसीय क्रिकेट असो, वा टी-२० क्रिकेट आपण नवीन प्रवाहांकडे जरा उशिरानेच वळतो. पण अशा नवीन प्रवाहांकडे भारताने वळणे, हे त्यांच्या शाश्वततेसाठी अखेरीस निर्णायक ठरते हे एकदिवसीय क्रिकेट आणि टी-२० क्रिकेटच्या लोकप्रियतेने दाखवून दिले आहे. आयपीएल हे याचे एक उत्तम उदाहरण. आता या सामन्याच्या निमित्ताने दिवस-रात्र क्रिकेटलाही बरकत येईल आणि प्रेक्षक मोठय़ा संख्येने या प्रकाराकडे वळतील, असा सौरवसारख्यांचा होरा आहे.

कसोटी क्रिकेट पूर्वीसारखे कंटाळवाणे राहिलेले नाही आणि हल्ली बहुतेक सामने निकाली निघतात हे खरे आहे. त्यामुळे हल्ली तिसऱ्या आणि चौथ्या दिवसांची तिकीटविक्री बऱ्यापैकी होते. परंतु इथे एक मेख आहे. ती म्हणजे, हल्ली प्रेक्षकांनाही ठाऊक असते, की पाचव्या दिवसापर्यंत फारच कमी कसोटी सामने लांबतात! त्यामुळेच मध्यंतरी कसोटी सामने चार दिवसांचेच असावेत, अशीही चर्चा सुरू होती. याचे प्रमुख कारण म्हणजे पाच दिवस टिकून खेळू शकतील असे कसोटी संघच हल्ली फारसे राहिलेले नाहीत. कसोटी क्रिकेट वाचवण्याच्या दृष्टीने ही मोठी चिंतेची बाब मानली जाते. भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेसारखा संघही पहिल्या सामन्याचा अपवाद वगळता साडेचार दिवस टिकू शकला नाही. आजघडीला भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि काही प्रमाणात न्यूझीलंड हे संघच कसोटीसाठी आवश्यक दर्जा टिकवून आहेत. अफगाणिस्तान आणि आर्यलडसारखे नवे संघ कसोटी कळपात दाखल झाले असले, तरी त्यांच्यामुळे एकूण दर्जात किंवा दर्जाच्या ऱ्हासात फरक पडला आहे, असे अजिबातच नाही. उलट वेस्ट इंडिज, श्रीलंका, पाकिस्तान आणि आता दक्षिण आफ्रिका या कसोटी संघांची कामगिरी अत्यंत निराशाजनक होताना दिसते. शिवाय त्यांच्या ढासळत्या दर्जामुळे दर्जेदार संघांचाही म्हणावा तसा कस लागत नाही हे वास्तव आहे. या परिस्थितीमध्ये भारतात दिवस-रात्र कसोटी सामने सुरू होऊन कितपत फरक पडेल किंवा काही फरक पडणार तरी का, या प्रश्नांची उत्तरे फार समाधानकारक आणि आश्वासक नाहीत. त्यामुळे आता भारतात कसोटी क्रिकेट थोडे अधिक लोकप्रिय होईल आणि त्याचा फायदा इतर देशांना होईल अशी आशा क्रिकेट समुदाय बाळगून आहे.

प्रथम थोडेसे दिवस-रात्र क्रिकेटविषयी. पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्याप्रमाणेच, पहिला दिवस-रात्र कसोटी सामनाही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात ऑस्ट्रेलियामध्येच खेळवला गेला. २७ नोव्हेंबर २०१५ रोजी सुरू झालेला हा सामना चुरशीचा झाला. पण तो तीनच दिवसांत संपला आणि ऑस्ट्रेलियाने तीन गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलिया या प्रकारच्या कसोटी सामन्यात भलताच माहिर झाला असे म्हणता येईल. कारण आजवर ते पाच दिवस-रात्र सामने खेळले आणि पाचही जिंकले! अर्थात हे सर्व सामने त्यांच्या घरच्या मैदानांवर (तीन अ‍ॅडलेडला आणि दोन ब्रिस्बेनला) खेळवले गेले होते. श्रीलंकेने तीनपैकी दोन जिंकले आहेत. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडनेही प्रत्येकी एकेक सामने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजने तिन्ही दिवस-रात्र सामने गमावले आहेत. आजवरचे ११ दिवस-रात्र कसोटी सामने उन्हाळ्यात खेळवले गेले. दोन सामने दुबईत खेळवले गेले, जिथे हिवाळा थंड नसतो. भारतातील हा सामना हिवाळ्यात खेळवला जात आहे. या ऋतूमध्ये मोठय़ा प्रमाणात दव जमा होते. सायंकाळी अशा प्रकारच्या दवामुळे चेंडू जड होतो आणि त्यावर नीट पकडही घेता येत नाही. त्यामुळे फलंदाजांचा फायदा होतो. सचिन तेंडुलकरने दिवस-रात्र सामन्याबाबत पहिली प्रतिक्रिया देताना दवाचाच उल्लेख केला. भारतात आजवर स्थानिक क्रिकेटमध्ये दिवस-रात्र बहुदिन सामने खेळवले गेले. ते सगळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झाले होते. दव तेव्हाही असतेच, पण हिवाळ्यात त्याचा प्रभाव अधिक असतो. कोलकातामध्ये ईडन गार्डन्सचे क्युरेटर सुजन मुखर्जी यांनी सांगितले, की हा सामना दीड वाजता सुरू होत असल्यामुळे दवाचा प्रभाव फार तर सायंकाळी साडेसातनंतर म्हणजे तासभरच राहील. अर्थात कसोटी क्रिकेटमध्ये तासाभरातही सामन्याचे चित्र पालटू शकते. तरीदेखील असे केल्यास, दिवस-रात्र सामन्याच्या मूळ हेतूलाच हरताळ फासल्यासारखे होईल. सायंकाळी ऑफिस, कॉलेज सुटल्यानंतर प्रेक्षकांनी मैदानांकडे वळावे, हे यात अपेक्षित आहे. केवळ तासभर किंवा दोन तासाचा खेळ पाहण्यासाठी जवळपास तितकाच वेळ घालून कोण सामना पाहायला येणार? सौरव गांगुलीला याची चिंता वाटत नाही. दीड-दोन तास घालवून क्रिकेटप्रेमी आयपीएल पाहायला येतातच, असे त्याचे उत्तर. पण ते पुरेसे समाधानकारक वाटत नाही. कारण आयपीएल हा एका दिवसाचा खेळ असतो. सतत तीन, चार किंवा पाच दिवस केवळ दीड-दोन तासांचे क्रिकेट पाहायला प्रेक्षक येतील का, याबाबत पुरेसा विचार झालेला नाही हे उघड आहे.

गुलाबी चेंडू हे दिवस-रात्र सामन्याचे एक प्रमुख वैशिष्टय़. एरवी कसोटी सामन्यात गडद लाल रंगाचे चेंडू वापरले जातात आणि मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी पांढरे चेंडू वापरले जातात. गुलाबी चेंडूंच्या वापरापूर्वी विशेषत ऑस्ट्रेलियात प्रायोगिक तत्त्वावर केशरी चेंडूचा वापरही झाला होता. परंतु गुलाबी चेंडू विशेषत रात्री विद्युतझोतात अधिक स्पष्ट दिसत असल्यामुळे त्यांना पसंती मिळाली. लाल चेंडूचा रंग सर्वाधिक काळ टिकतो आणि पांढरा चेंडू तुलनेने अधिक मळखाऊ असतो. परंतु मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये गोलंदाजांवरच बंधने अधिक असल्यामुळे हा घटक फारसा निर्णायक ठरत नाही. उलट कसोटी क्रिकेटमध्ये आजही गोलंदाजांना काही मुभा असते. लाल गुलाबी रंग फिकट असल्यामुळे गुलाबी चेंडूही चटकन रंग गमावू शकतो. हे होऊ नये, यासाठी गुलाबी रंगात वॉर्निशसारखा एक लेप (लॅकर) मिसळला जातो. या लेपामुळे गुलाबी चेंडू स्विंग होण्याचे प्रमाण पांढऱ्या किंवा लाल चेंडूपेक्षा अधिक असते. गुलाबी चेंडू दिसण्यात फारशी अडचण नसते. मात्र संधिप्रकाशात तो केशरी रंगासारखा भासतो, ज्यातून गोंधळ उडू शकतो. तो चटकन खराब होऊ नये, यासाठी अशा सामन्यांच्या खेळपट्टय़ांवर अधिक हिरवळ ठेवली जाते. यातून सीम गोलंदाजांनाही (उदा. मोहम्मद शामी) फायदा होत असला, तरी फिरकी गोलंदाजांना मात्र तितकासा वाव राहात नाही. एक तर गुलाबी चेंडू अधिक टणक असतो आणि खेळपट्टीवरील थोडय़ा अधिक हिरवळीमुळे तो पुरेसा वळतही नाही. दिवस-रात्र क्रिकेटचा प्रसार करताना ही महत्त्वाची बाब ध्यानात ठेवावी लागेल. कोलकात्यातील सामन्यात एसजी चेंडू वापरले जातील. सप्टेंबर महिन्यात दुलीप ट्रॉफी अंतिम सामन्यात ते वापरले गेले होते. पहिली चार-पाच षटकेच चेंडू स्विंग होतो. त्यानंतर ना वळतो, ना सीमवरून उसळतो ना रिव्हर्स स्विंग होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत दोन्ही संघ धावांच्या राशी रचू शकतात. पण हा अनुभव कुकाबुरा चेंडूंबाबत होता. एसजी चेंडू त्यांच्यापेक्षा वेगळे आणि चागले ठरतील, अशी आशा ते बनवणाऱ्या कंपनीला वाटते.

दिवस-रात्र क्रिकेटसमोर अशी आव्हाने भरपूर आहेत. पण सौरवसारख्यांना या प्रकारात कसोटी क्रिकेटचे भवितव्य उज्ज्वल दिसते. बांगलादेशविरुद्ध आणि भविष्यात आणखी काही सामन्यांनंतर कदाचित याबाबत चित्र अधिक स्पष्ट होईल.
सौजन्य – लोकप्रभा