मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये पुढील हंगामापासून दोन नवे संघ समाविष्ट केले जाणार आहेत. ‘बीसीसीआय’ दोन नवीन संघांचा लिलाव १७ ऑक्टोबर रोजी करणार असून हे संघ खरेदी करण्यासाठी ५ ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.

‘‘दोन नवीन संघांचा लिलाव १७ ऑक्टोबरला करण्याची ‘बीसीसीआय’ची योजना आहे आणि ही प्रक्रिया ऑनलाइन माध्यमातून होईल,’’ अशी माहिती देण्यात आली. ‘आयपीएल’ प्रशासकीय समितीने ३१ ऑगस्ट रोजी दोन नव्या संघांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. हे संघ कोणत्या शहरांचे प्रतिनिधित्व करणार हे १७ ऑक्टोबरला ठरणार आहे. संघमालकांपुढे अहमदाबाद, लखनौ आणि पुणे यांसह अन्य काही शहरांचा पर्याय असेल.

…तर आफ्रिका-श्रीलंकेचे खेळाडू पहिल्या आठवड्याला मुकणार?

श्रीलंका आणि आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या मालिकेमुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या अडचणीत भर पडू शकते. दोन्ही संघांमधील खेळाडू पहिल्या आठवड्याला मुकण्याची शक्यता आहे. संयुक्त अरब अमिरातीत येत्या रविवारपासून ‘आयपीएल’च्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ होत आहे. एका जैव सुरक्षित परिघातून दुसऱ्या परिघात जाताना कोणतीही समस्या नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आधी म्हटले होते. मात्र अमिरातीच्या करोना निर्बंध कडक असलेल्या यादीत श्रीलंकेचा समावेश आहे. त्यामुळे या देशातून येणाऱ्या खेळाडूंबाबत कोणते धोरण वापरले जाणार, याबाबत ‘आयपीएल’मधील संघांनी ‘बीसीसीआय’कडून स्पष्टीकरण मागवले आहे. क्विंटन डीकॉक (मुंबई इंडियन्स), ताब्रेझ शाम्सी, डेव्हिड मिलर (राजस्थान रॉयल्स), वानिंदू हसरंगा, दुष्मंथा चामीरा (रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु),  एडीन मार्कराम (पंजाब किंग्ज) हे महत्त्वाचे खेळाडू सध्या आफ्रिका-श्रीलंका खेळत आहेत.