हॉकी इंडिया लीग स्पर्धेत नव्या नियमाची अंमलबजावणी
मैदानी गोल करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हॉकी इंडिया लीगच्या चौथ्या मोसमात एका फील्ड गोलच्या वेळी दोन गोल दिले जाणार आहेत. आगामी लीगकरिता तयार करण्यात आलेल्या नियमावलीत या नियमाचा समावेश करण्यात आला आहे.
लीगचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी सांगितले, लीगसाठी खेळाडूंचा लिलाव १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. या लिलावात १३५ भारतीय खेळाडू व १४१ परदेशी खेळाडूंकरिता बोली लावली जाणार आहे. प्रत्येक फ्रँचाईजीला २४ खेळाडूंऐवजी वीस खेळाडू घेण्यास परवानगी दिली जाईल. त्यापैकी बारा खेळाडू भारतीय असतील तर आठ खेळाडू परदेशी असतील. प्रत्येक संघात किमान दोन गोलरक्षकांचा समावेश अनिवार्य करण्यात आला आहे. संघात समावेश करण्यात आलेले सर्व खेळाडू सामन्याच्या वेळी उपस्थित असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
बेशिस्त वर्तनावर अंकुश ठेवण्यासाठी प्रत्येक पेनल्टी स्ट्रोकच्या वेळी झालेल्या एक गोलाच्या वेळी दोन गोल बहाल केले जातील. या नियमावलीस आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या स्पर्धा व नियमावली समितीने मान्यता दिली आहे. गोल पद्धतीत अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फील्ड गोलऐवजी अनेक खेळाडू पेनल्टी कॉर्नरची प्रतीक्षा करीत असतात. त्यामुळे प्रत्येक संघात पेनल्टी कॉर्नरतज्ज्ञ तयार केले जातात. ही गोष्ट चांगली असली तरी पेनल्टीऐवजी अन्य वेळी गोल करण्यासाठी खेळाडूंचे कौशल्य वाढावे या हेतूनेच फील्ड गोलकरिता दोन गोल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे बात्रा यांनी सांगितले.

पाकिस्तानच्या बेशिस्त खेळाडूंना संधी नाहीच : बात्रा
पाकिस्तान संघात अनेक अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. त्यांचे हॉकी इंडिया लीगमध्ये स्वागतच होईल, मात्र त्यांच्या बेशिस्त वर्तनास आम्ही थारा देणार नाही. गतवर्षी भुवनेश्वर येथे झालेल्या चॅम्पियन्स स्पर्धेत त्यांच्या दोन खेळाडूंवर बेशिस्त वर्तनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी भारतीय खेळाडूंच्या दिशेने अपशब्द उच्चारले होते, तसेच सामना जिंकल्यानंतर अतिशय लज्जास्पद वर्तन केले होते. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने त्यांच्यावर बंदी घातली आहे. मात्र झालेल्या घटनेबाबत साधी दिलगिरी व्यक्त करण्यात त्यांना कमीपणा वाटला आहे. अशा खेळाडूंना आम्ही संधी देणार नाही असे बात्रा यांनी सांगितले.
हॉकी लीगच्या पहिल्या मोसमात पाकिस्तानचे नऊ खेळाडू सहभागी झाले होते, मात्र नंतर राजकीय मतभेदांमुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना या लीगमध्ये संधी मिळालेली नाही.
..तर गुरबाजचा समावेश होईल
भारताचा अव्वल दर्जाचा खेळाडू गुरबाजसिंग याच्यावर सध्या शिस्तभंगाची कारवाई सुरू आहे. त्याच्यावरील खटल्याची १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. जर त्यामध्ये गुरबाजच्या बाजूने निकाल लागला व त्याच्यावरील बंदीची कारवाई स्थगित झाली तर त्याचा या लीगमध्ये समावेश होईल असे बात्रा म्हणाले.