भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेला आजपासून राजकोटमध्ये सुरुवात
कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध पराभूत, इंग्लंड आणि पाकिस्तानविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका बरोबरीत आणि पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुन्हा एकदा पराभव पदरी.. अशा विवंचनेत सापडलेल्या भारतीय संघाला सावरण्यासाठी आणि इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. नाताळ आणि नववर्षांच्या सुटीचा आनंद लुटून इंग्लंड संघ नव्या जोशाने पुन्हा भारतात परतला असला तरी पाहुण्यांच्या अननुभवी गोलंदाजीमुळे राजकोट येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचे पारडे जड मानले जात आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय फलंदाजीची लक्तरे वेशीवर टांगली गेली. त्यामुळे निवड समितीने फॉर्मात नसलेल्या सलामीवीर वीरेंद्र सेहवागला संघातून डच्चू दिला. त्याच्या जागी फॉर्मात असलेल्या आणि रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्रिशतकी खेळी साकारणाऱ्या चेतेश्वर पुजाराला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघात संधी दिली. पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १० धावांनी रोमहर्षक विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला असला तरी यजमानांना कमकुवत बाजूंवर मेहनत घ्यावी लागणार आहे.
भारतभूमीत कसोटी मालिका जिंकण्याची करामत करणारा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुककडेच इंग्लंडचे नेतृत्व असले तरी त्यांना अव्वल गोलंदाजांची उणीव जाणवणार आहे. भारतीय फलंदाजांवर हुकमत गाजवण्यासाठी इंग्लंडच्या अननुभवी गोलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी वगळला तर भारताच्या एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. धोनीने तीन सामन्यांत एक शतक आणि एका अर्धशतकासह २०३ धावा फटकावल्या. सलामीवीर गौतम गंभीर, विराट कोहली आणि युवराज सिंग हे भारताचे अव्वल फलंदाज पाकिस्तानविरुद्ध सपेशल अपयशी ठरले, पण सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमच्या पाटा खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २००८ मध्ये राजकोट येथे झालेल्या गेल्या एकदिवसीय सामन्यात सेहवाग, गंभीर आणि युवराजने इंग्लिश गोलंदाजीच्या चिंधडय़ा उडवल्या होत्या. पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टय़ांवर चांगली कामगिरी करणारा भुवनेश्वर कुमार आणि शामी अहमद या वेगवान गोलंदाजांची राजकोटच्या खेळपट्टीवर कसोटी लागणार आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला पाटा खेळपट्टीवरही मोलाचे योगदान द्यावे लागणार आहे. रविचंद्रन अश्विनसह रवींद्र जडेजा आणि युवराज सिंग या फिरकीपटूंना इंग्लंडच्या फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल.
रणजी स्पर्धेतील कर्नाटकविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पुजाराने गुरुवारी त्रिशतकाची नोंद केली, पण पुढील दिवशी घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात पुजाराचा अंतिम ११ संघात समावेश होईल की नाही, याबाबत साशंकता आहे.
इंग्लंड संघाच्या गोलंदाजीची भिस्त टिम ब्रेस्नन, स्टीव्हन फिन, स्टुअर्ट मीकर आणि जेड डेर्नबॅच यांच्यावर आहे. फलंदाजीत इंग्लंडला कर्णधार कुकवरच अधिक अवलंबून राहावे लागणार आहे. तसेच इयान बेल, केव्हिन पीटरसन आणि इऑन मॉर्गन यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची इंग्लंडला अपेक्षा आहे.
यष्टिरक्षक क्रेग किस्वेटर आणि जोसेफ बटलर यांच्यातही मोठी खेळी करण्याची क्षमता आहे.

प्रतिस्पर्धी संघ
भारत: महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, युवराज सिंग, सुरेश रैना, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, अशोक दिंडा, शामी अहमद.
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), जो रूट, इयान बेल, टिम ब्रेस्नन, डॅनी ब्रिग्स, जोसेफ बटलर, जेड डेर्नबॅच, स्टीव्हन फिन, क्रेग किस्वेटर, स्टुअर्ट मीकर, इऑन मॉर्गन, समित पटेल, केव्हिन पीटरसन, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस वोक्स.
सामन्याची वेळ : दुपारी १२ वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट, स्टार स्पोर्ट्स.

 पुजारा खेळण्याची शक्यता कमी
संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे. संघाची साधारण रचना ठरलेली आहे. दुखापत झाली तरच यात बदल होऊ शकतो. त्यामुळे चेतेश्वर पुजाराला या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. दमदार सलामी मिळू न शकल्याने संघाच्या कामगिरीवर परिणाम होत आहे. अजिंक्य रहाणे गंभीरच्या साथीने सलामीला येईल.  
– महेंद्र सिंग धोनी, भारताचा कर्णधार

सर्वोत्तम कामगिरी झाल्यासच भारताला नमवू.
सर्व खेळाडूंनी सर्वोत्तम अशी कामगिरी केली तरच भारताला नमवण्याची किमया आम्ही करू शकतो. आमच्या संघात अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहेत, तसेच काही अननुभवी खेळाडू आहेत. काही महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे भारताला हरवणे आमच्यासाठी सोपे असणार नाही. नव्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची ही चांगली संधी आहे.
– अ‍ॅलिस्टर कुक, इंग्लंडचा कर्णधार