पीबीएलच्या दुसऱ्या हंगामात नव्या नियमांची जंत्री
प्रीमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) हे नवे नाव धारण करून बॅडमिंटनमधील लीगच्या दुसऱ्या हंगामाला २ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. ‘नया है यह..’ असे बिरुद जपत १६ दिवस चालणाऱ्या पीबीएलमध्ये ‘हुकमाचा सामना’ हा नवा नियम सामन्याचा निकाल पालटू शकणार आहे.
प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये प्रत्येक लढतीमध्ये पाच सामन्यांचा समावेश असेल. याशिवाय प्रत्येक संघाला प्रत्येक लढतीतील एक ‘हुकमाचा सामना’ निश्चित करावा लागेल. हा सामना जिंकल्यास संघाला बोनस गुण मिळेल, मात्र गमावल्यास गुण वजा होणार आहेत.
याचप्रमाणे लीगमधील प्रत्येक सामना सर्वोत्तम तीन गेम्सचा असणार आहे आणि प्रत्येक गेम हा १५ गुणांचा असेल. १४-ऑल (दोन्ही खेळाडूंचे समान) झाल्यास ‘सडन डेथ’ लागू होईल. हा आणखी एक बदल नियमात करण्यात आला आहे.
‘‘पीबीएल अधिक स्पर्धात्मक करण्यासाठी नव्या नियमांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या नियमांमुळे निकालातील रंगत वाढेल,’’ असे भारतीय बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आणि पीबीएलचे प्रमुख अखिलेश दास यांनी सांगितले.
प्रत्येक सामना जिंकल्यास संघाला एक गुण मिळेल आणि हरल्यास शून्य गुण वाटय़ाला येईल. ‘हुकमाचा सामना’ या नियमांतर्गत दोन्ही संघ लढत सुरू होण्यापूर्वी एक तास आधी सामनाधिकाऱ्यांकडे पाच सामन्यांपैकी एक सामना निश्चित करू शकेल. ‘हुकमाचा सामना’ जिंकल्यास विजयासाठी दोन गुण आणि हरल्यास एक गुण वजा होईल. त्यामुळे दोन्ही संघ एकच ‘हुकमाचा सामना’ निश्चित करण्याची शक्यतासुद्धा आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना ‘+२’ किंवा ‘-१’ गुण वाटय़ाला येऊ शकतील.
नव्या स्वरूपानुसार, प्रत्येक संघ अन्य पाच संघांशी पाच लढती खेळतील. साखळीनंतर उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने होतील. प्रत्येक लढतीत पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, मिश्र दुहेरी आणि पुरुष एकेरी असे पाच सामने होतील. त्यामुळे महिला दुहेरी सामन्यावर पहिल्या हंगामाप्रमाणेच यंदाही काट मारण्यात आली आहे.