दुखापतींनी हैराण झालेल्या पाकिस्तानी संघावर यजमान न्यूझीलंडने पहिल्या टी-२० सामन्यात मात केली आहे. ऑकलंडच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचं आव्हान ५ गडी राखून परतवून लावलं. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने १-० ने विजयी आघाडी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जेकब डफीने ४ बळी घेत सामनावीराचा किताब पटकावला.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा पाकिस्तानचा निर्णय पूरता फसला. नवोदीत डफीने पाकिस्तानची आघाडीची फळी कापून काढली. मोहम्मद रिझवान, अब्दुल्ला शफीक, हैदर अली, मोहम्मद हाफीज हे फलंदाज झटपट माघारी परतले. ४ बाद २० अशी दयनीय अवस्था असताना पाक कर्णधार शादाब खानने अखेरच्या फळीतील फलंदाजांच्या साथीने फटकेबाजीला सुरुवात केली. ३२ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांसह शादाबने ४२ धावा केल्या. त्याला फईम अश्रफने ३१ धावा करत चांगली साथ दिली. अखेरीस निर्धारित षटकांत पाकिस्तानचा संघ ० गड्यांच्या मोबदल्यात १५३ धावांपर्यंत मजल मारु शकला. न्यूझीलंडकडून डफीने ४, कगलायनने ३ तर सोधी आणि टिकनरने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडच्या डावाची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर मार्टीन गप्टीलला शाहीन आफ्रिदीने तर डेवॉन कॉनवेला हारिस रौफने माघारी धाडत न्यूझीलंडला धक्का दिला. मात्र दुसऱ्या बाजूने सलामीवीर टीम सेफर्टने एक बाजू लावून धरत पाकिस्तानला वरचढ होण्याची संधीच दिली नाही. मधल्या फळीतल्या फलंदाजांच्या साथीने फटकेबाजी करत सेफर्टने अर्धशतक झळकावलं. त्याने ४३ चेंडूत ६ चौकार आणि एक षटकार लगावला. सेफर्टला बाद करण्यात पाकच्या गोलंदाजांना यश आलं मात्र तोपर्यंत सामना हातातून निघून गेला होता. जेम्स निशम आणि कर्णधार मिचेल सँटनर यांनी औपचारिकता पूर्ण करुन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.