न्यूझीलंड-श्रीलंका क्रिकेट मालिका

कँडी : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या उत्कंठावर्धक ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेला चार गडी आणि दोन चेंडू राखून पराभूत केले. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

श्रीलंकेने दिलेले १६२ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने १९.४ षटकांत सहा फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. अखेरच्या षटकात दोन फलंदाज गमावूनही न्यूझीलंडने विजय मिळवला. टिम साऊदीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मालिकेतील तिसरा सामना शुक्रवारी खेळला जाणार आहे.

प्रथम गोलंदाजी करताना कर्णधार साऊदी आणि सेथ रान्स यांनी  केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने श्रीलंकेला २० षटकांत ९ बाद १६१ धावांत रोखले. श्रीलंकेतर्फे अविष्का फर्नाडो (३७) आणि निरोशन डिकवेला (३९) यांनी उपयुक्त योगदान दिले.

प्रत्युत्तरात कॉलिन डीग्रँडहोम (५९) आणि टॉम ब्रूस (५३) यांनी अर्धशतके झळकावून चौथ्या गडय़ासाठी १११ धावांची भागीदारी रचून न्यूझीलंडच्या विजयाचा मार्ग सुकर केला.

 

संक्षिप्त धावफलक

’ श्रीलंका : २० षटकांत ९ बाद १६१ (निरोशन डिकवेला ३९, अविष्का फर्नाडो ३७, टिम साऊदी २/१८) पराभूत वि.

’ न्यूझीलंड : १९.४ षटकांत ६ बाद १६५ (कॉलिन डीग्रँडहोम ५९, टॉम ब्रूस ५३; अकिला धनंजया ३/३६).

’ सामनावीर : टिम साऊदी