न्यूझीलंड क्रिकेट संघ तब्बल १८ वर्षानंतर पाकिस्तानात क्रिकेट सामने खेळणार होता. मात्र पुन्हा एकदा सुरक्षेचं कारण देत दौरा स्थगित केल्याचं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. शेवटच्या क्षणी न्यूझीलंडने माघार घेतल्याने पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात तीन एकदिवसीय आणि पाच टी २० सामन्यांची मालिका खेळली जाणार होती.

आज न्यूझीलंड आणि पाकिस्तान दरम्यान एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना होणार होता. सकाळपासून दोन्ही संघ हॉटेलमध्ये थांबले होते. तसेच प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला गेला नव्हता. त्यामुळे सामना होणार की नाही? याबाबत शंका उपस्थित केली जात होती. “आम्ही न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला सुरक्षेबाबत कळवले आणि त्यांनी एकतर्फी निर्णय घेत मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबी आणि सरकारने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. नियोजित सामने सुरु ठेवण्यासाठी पीसीबी सज्ज आहे. मात्र पाकिस्तान आणि जगभरातील क्रीडाप्रेमी शेवटच्या क्षणाला मालिका स्थगित केल्याने निराश होतील”, असं पीसीबीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

न्यूझीलंड संघाशी निगडीत सुरक्षेबाबत इंटेलिजेंस अलर्ट मिळाला होता. आता न्यूझीलंड संघाला लवकरात लवकर पाकिस्तानातून बाहेर काढण्याची तयारी सुरु झाली आहे.

“आम्हाला दिलेल्या सल्ल्यानुसार दौरा सुरु ठेवणं शक्य नव्हतं. मला वाटतं पीसीबीसाठी हा धक्का असेल. पण खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यासाठी दौरा स्थगित करणं योग्य आहे”, असं मत न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी सदस्य डेविड व्हाइट यांनी नोंदवलं आहे. अफगाणिस्तानात तालिबाननं सत्ता प्रस्थापित केल्यानंतर पाकिस्तानातही असुरक्षेचं वातावरण निर्माण झालं आहे. टी २० विश्वचषकापूर्वी इंग्लंडचा संघही पाकिस्तान दौरा करणार आहे. आता इंग्लंडचा संघ पाकिस्तानात येतो की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मार्च २००९ मध्ये लाहोरच्या स्टेडियमबाहेर कसोटी सामना खेळण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. ज्यात श्रीलंकेचे खेळाडू जखमी झाले होते. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघही पाकिस्तान मालिका खेळण्यासाठी येत होता. मात्र किवी संघाला श्रीलंका संघावर लाहोरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला झाल्याचं समजताच, ते अर्ध्यावरून मायदेशी परतलो होते.