ख्राइस्टचर्च : जेम्स विन्सने (५९) झळकावलेल्या कारकीर्दीतील पहिल्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात यजमान न्यूझीलंडचा सात गडी आणि नऊ चेंडू राखून पराभव करून मालिकेत १-०ने आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना अनुभवी रॉस टेलर (४४) आणि टिम स्टेफर्ट (३२) यांच्या योगदानामुळे न्यूझीलंडने २० षटकांत ५ बाद १५३ धावा केल्या.

प्रत्युत्तरात सलामीवीर जॉनी बेअरस्टो (३५) आणि डेव्हिड मालन (११) यांनी इंग्लंडला सावध सुरुवात करून दिली. मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या विन्सने सात चौकार आणि दोन षटकारांसह ५९ धावा फटकावून इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. तो बाद झाल्यानंतर कर्णधार ईऑन मॉर्गनने (नाबाद ३४) षटकार लगावून इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडतर्फे मिचेल सँटनरने तीनही बळी मिळवले. पाच लढतींच्या या मालिकेतील दुसरा सामना रविवारी वेलिंग्टन येथे खेळला जाणार आहे.