क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी तुम्ही कोणते सर्वात विचित्र कारण दिले आहे? आजारी असणे किंवा कोणाची तरी तब्बेत बरी नसणे किंवा अगदी काहीतरी कौटुंबिक कारण सांगून सुट्टी मारणारे अनेक क्रिकेट चाहते आहेत. मात्र या सर्व कारणांना मागे टाकत न्यूझीलंडच्या काही चाहत्यांनी तुमचा विश्वास बसणार नाही अशी गोष्ट केली आहे आणि तीही केवळ सामना पाहण्यासाठी. शनिवारी मँचेस्टरमधील मैदानात झालेला वेस्ट इंडिजविरोधातील सामना न्यूझीलंडने अवघ्या पाच धावांनी जिंकला. यंदाच्या विश्वचषकातील अनेक सामने एकतर्फी झालेले असतानाच शनिवारी हा झालेला सामना अगदी अगदीच रोमहर्षक झाला.
न्यूझीलंडने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी २९२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज टीमने चांगला खेळ केला. एकीकडे गडी बाद होत असतानाच कार्लोस ब्रेथवेटने दुसरी बाजू लावून धरली आणि विजय अगदी वेस्ट इंडिजच्या दृष्टीपथात असताना षटकार मारायच्या नादात ब्रेथवेट बाद झाला अन् हा सामना न्यूझीलंडने पाच धावांनी जिंकली. मैदानात अटीतटीची लढत सुरु होती. केवळ बारा चेंडू आणि एक गडी शिल्लक असतानाच एअर न्यूझीलंडचे एक विमान उड्डाण घेण्यास तयार होते. मात्र विमानातील अनेक प्रवासी मोबाइलवरुन लाइव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून सामना पाहत होते. त्यामुळेच विमान उड्डाण घेताना मोबाइल बंद करण्याऐवजी सर्वांनी सामना संपेपर्यंत विमानचे उड्डाण थांबवावे अशी विनंती केबीन क्रूच्या माध्यामातून विमानाच्या कॅप्टनला केली. विशेष म्हणजे विमानाच्या कॅप्टनने प्रवाशांच्या विनंतीचा मान ठेवत सामन्याचा निकाल लागेपर्यंत विमानाचे उड्डाण केले नाही. १२ पैकी सहा चेंडूत सामन्याचा निकाल लागला अन् सामना न्यूझीलंडने जिंकला. त्यावेळी विमानातील प्रवाश्यांनी एकच जल्लोष केला अन् विमानाने पुढच्या मिनिटाला उड्डाण केले. याच विमानातू प्रवास करणारे न्यूझीलंडचे खासदार किरेन मॅकनल्टी यांनी ट्विट करुन संपूर्ण प्रसंगाची माहिती दिली आहे. किरेन आपल्या ट्विटमध्ये लिहितात, ‘न्यूझीलंड एअर लाइन्सचे विमान पूर्णपणे प्रवाशांनी भरलेले होते. अनेकजण लाइव्ह स्ट्रीमवर क्रिकेटचा सामना पाहत होते. १२ चेंडू बाकी असताना न्यूझीलंडला विजयासाठी एका विकेटची गरज होती. कृपया विमान सुरु करु नका अशी विनंती प्रवाश्यांनी कॅप्टनला केली. पुढच्या काही मिनिटांमध्ये न्यूझीलंडचा संघ जिंकला. त्याच क्षणी विमानातील सर्वांनी ओरडून जल्लोष साजरा केला. त्यानंतर विमानाने उड्डाण केले. खूप छान क्षण होता हा.’ किरेन हे देशातील लेबर पक्षाचे खासदार आहेत.
My @FlyAirNZ flight was fully boarded, the plane loud from all the live streams. 12 balls left, 1 wicket needed. Please don’t start the plane. The @BLACKCAPS win! We all erupt in unison. Only then, amongst the cheers, did the plane start to move. It was a beautiful moment. #CWC19
— Kieran McAnulty MP (@Kieran_McAnulty) June 22, 2019
दरम्यान या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण विंडजने दिलं. केन विल्यमसन १४८ धावा आणि रॉस टेलर ६९ धावा यांच्या बळावर न्यूझीलंडने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी २९२ धावांचे आव्हान दिले होते. न्यूझीलंडने दिलेल्या २९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. शाय होप आणि निकोलस पूरन सुरूवातीलाच बाद झाले. पण, सलामीला उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने आक्रमक खेळी करत ८४ चेंडूत ८७ धावा केल्या, त्याला हेटमायरने चांगली साथ दिली आणि ५४ धावा केल्या. नंतर ख्रिस गेल आणि सिमरॉन हेटमायरच्या झंझावाती फलंदाजीनंतर मधली फळी कोलमडली. मात्र तुफानी शतकी खेळी करताना कार्लोस ब्रेथवेटने लढतीत रंगत आणली. ब्रेथवेटने ९ चौकार आणि ५ उत्तुंग षटकारांच्या सहाय्याने ८२ चेंडूंमध्ये १०१ धावांची तुफानी खेळी केली. त्याने एका बाजूने खिंड लढवत शानदार शतकी खेळी केली आणि वेस्ट इंडिजला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. सात चेडूंमध्ये पाच धावांची आवश्यकता असताना त्याने विजयी षटकार मारण्याच्या प्रयत्न केला पण चेंडू ट्रेंट बोल्टने सीमारेषेनजीक टिपला आणि न्यूझीलंडने पाच धावांनी विजय मिळवला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 24, 2019 3:05 pm