न्यूझीलंडने यजमान इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका १-०ने जिंकली आहे. केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडचा संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. न्यूझीलंडने तब्बल २२ वर्षानंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली आहे. यापूर्वी, त्यांनी शेवटच्या चारमध्ये तीन मालिका गमावल्या होत्या, तर एक मालिका अनिर्णित राहिली होती.

दोन्ही संघांमधील लॉर्ड्स येथे खेळला गेलेला पहिला सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात ३०३ आणि दुसऱ्या डावात १२२ धावा केल्या. न्यूझीलंडने पहिल्या डावात ३८८ धावा केल्या होत्या. त्यामुळे टॉम लॅथमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या न्यूझीलंडला ३८ धावांचे लक्ष्य मिळाले होते. न्यूझीलंडने दोन विकेट गमावून हे साध्य केले.

हेही वाचा – भारताचा ‘जावई’ असलेल्या क्रिकेटपटूची पाकिस्तान सुपर लीगमधून माघार

रविवारी झालेल्या सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंड संघ दुसऱ्या डावात ९ बाद १२२ धावा अशा अवस्थेत होता. दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर ओली स्टोनला ट्रेंट बोल्टने बाद केले. जेम्स अँडरसन शून्यावर नाबाद राहिला. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली नव्हती. पहिल्या कसोटीत दुहेरी शतक झळकावणाऱ्या डेव्हन कॉनवेला स्टुअर्ट ब्रॉडने अवघ्या ३ धावांवर बाद केले. तर विल यंग ८ धावांवर माघारी परतला. टॉम लॅथम २३ धावांवर आणि रॉस टेलर शून्यावर नाबाद राहिला. लाथमच्या कसोटीतही ४ हजार धावा पूर्ण झाल्या.

हेही वाचा – कभी आगे तू कभी पीछे मै..! स्कॉटलंडहून मागवलेल्या घोड्यासह ३९ वर्षीय धोनीनं लावली शर्यत

२२ वर्षांनंतर न्यूझीलंडचा इंग्लंडमध्ये विजय

इंग्लंडच्या संघाने सात वर्षानंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली आहे. २०१४मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील इंग्लंडला ०-१ असा पराभव पत्करावा लागला होता. २२ वर्षानंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्यात न्यूझीलंडचा संघ यशस्वी ठरला आहे. १९९९ मध्ये शेवटच्या वेळी स्टीफन फ्लेमिंगच्या नेतृत्वात किवी संघाने इंग्लंडच्या संघाला त्यांच्या मातीत चार सामन्यांच्या मालिकेत २-१ने पराभूत केले होते.

आता लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल!

आता न्यूझीलंडचे पुढचे लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकणे हे आहे. किवी कर्णधार केन विल्यमसनकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी अनेक खेळाडूंचे पर्याय आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२जून दरम्यान हा सामना खेळला जाणार आहे. संघातील सर्व वेगवान गोलंदाज फॉर्ममध्ये आहेत. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम साऊथीने सहा गडी बाद केले, तर काइल जेमिसननेही चमकदार कामगिरी केली. दुसर्‍या कसोटी सामन्यात ट्रेंट बोल्ट, नील वॅग्नर आणि मॅट हेन्री यांनीही शानदार गोलंदाजी केली आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंड चार वेगवान गोलंदाजांसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो.