न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा कर्णधार विराट कोहलीची व्यूहरचना

गतवर्षी न्यूझीलंडमध्ये मिळवलेला एकदिवसीय मालिका विजय आणि नुकताच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पिछाडीवरून सरशी साधल्यामुळे आगामी न्यूझीलंड दौऱ्यातसुद्धा भारतीय संघ यजमानांवर सामन्याच्या पहिल्या चेंडूपासूनच दडपण टाकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल, अशी प्रतिक्रिया कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली.

रविवारी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय लढतीत भारताने सात गडी राखून विजय मिळवत मालिकेवर २-१ असा कब्जा केला. आता २४ जानेवारीपासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार असून उभय संघांत पाच ट्वेन्टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. गतवर्षी भारताने न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत एकदिवसीय मालिकेत ४-१ असे पराभूत केले, तर ट्वेन्टी-२० मालिकेत मात्र यजमानांनी भारताला २-१ असे नमवले होते.

‘‘गतवर्षी न्यूझीलंडमध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी यावेळी आम्हाला फार लाभदायक ठरणार आहे. संपूर्ण दौऱ्यात आम्ही सकारात्मक खेळ केला. विदेशी भूमींवर खेळताना तुम्ही सुरुवातीपासूनच यजमान संघावर वर्चस्व मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे यावेळीसुद्धा आम्ही त्याच रणनीतीचा अवलंब करणार आहोत,’’ असे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहली म्हणाला. न्यूझीलंड दौऱ्यासाठी सोमवारी रात्री भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला.

‘‘कोणत्याही दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी तुम्ही जर त्याआधीची मालिका जिंकली असेल, तर तुमच्या मानसिकतेवरही त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो. ऑस्ट्रेलियासारख्या लढाऊ संघाविरुद्ध मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर असतानाही आम्ही विजयश्री मिळवल्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे,’’ असेही कोहलीने सांगितले. परंतु प्रथम फलंदाजी करून आव्हानात्मक धावसंख्या उभारल्यास आम्हाला त्याचा बचाव करणेही जमले पाहिजे, या गोष्टीकडेही कोहलीने लक्ष वेधले.

कोहलीकडून श्रेयसवर कौतुकाचा वर्षांव

रोहित शर्माचे शतक आणि स्वत:ने झळकावलेल्या दमदार अर्धशतकानंतरही कोहलीने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करून संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या मुंबईकर श्रेयस अय्यरचे विशेष कौतुक केले. ‘‘पहिल्या दोन सामन्यांतील अपयशाचा श्रेयसने किंचितही अतिरिक्त दडपण न घेतल्याचे या खेळीदरम्यान दिसून आले. मी आणि रोहित दोघेही संघाला विजयीरेषा गाठून देण्यापूर्वीच माघारी परतलो. मात्र अशा वेळी श्रेयसने केलेली फटकेबाजी उपयुक्त ठरली. त्यामुळे माझ्यावरीलही दडपण कमी झाले,’’ असे कोहली म्हणाला.

कोहली सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू -फिंच

भारताचा विराट कोहली हा विश्वातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू आहे, अशी स्तुतिसुमने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने कोहलीवर उधळली आहेत. ‘‘भारताकडे कोहलीसारखा मौल्यवान खेळाडू आहे. माझ्या मते तो सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू आहे. त्याशिवाय रोहितचासुद्धा विश्वातील पाच उत्कृष्ट फलंदाजांमध्ये नक्कीच समावेश होईल. त्यामुळेच जेव्हा असे दोन मातब्बर खेळाडू तुमच्या संघात असतात. त्यावेळी कठीण परिस्थितीतूनही संघाला विजय मिळवणे शक्य होते,’’ असे फिंच म्हणाला.

कोहली, बुमराचे क्रमवारीतील अग्रस्थान अबाधित

दुबई : भारताच्या विराट कोहली आणि जसप्रीत बुमरा यांनी ‘आयसीसी’च्या एकदिवसीय क्रमवारीतील अनुक्रमे फलंदाज आणि गोलंदाजांच्या यादीतील अग्रस्थान कायम राखले आहे.

सोमवारी ‘आयसीसी’ने ताजी क्रमावारी जाहीर केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मालिकावीर पुरस्कार पटकावल्यामुळे कोहलीच्या खात्यात दोन गुणांनी वाढ झाली असून सध्या त्याच्या नावावर ८८६ गुण आहेत. त्याचप्रमाणे रोहित शर्मानेसुद्धा दुसरे स्थान कायम राखले असून त्याच्या नावावर ८६८ गुण आहेत. त्याशिवाय के. एल. राहुलने तब्बल २१ स्थानांनी मुसंडी मारून थेट ५०वा क्रमांक मिळवला आहे.

गोलंदाजांमध्ये बुमराने (७६४) अग्रस्थान कायम राखले आहे. अव्वल १० गोलंदाजांमध्ये बुमरा भारताचा एकमेव गोलंदाज आहे. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आणि अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.