News Flash

मालिका विजयानंतर आता भारताला प्रयोगाची संधी

आज वेलिंग्टनला चौथा ट्वेन्टी-२० सामना

| January 31, 2020 01:18 am

आज वेलिंग्टनला चौथा ट्वेन्टी-२० सामना

भारत-न्यूझीलंड क्रिकेट मालिका

वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्याच्या ‘सुपर ओव्हर’मध्ये रोहित शर्माने अखेरच्या दोन चेंडूंवर दोन षटकार खेचत भारताला मिळवून दिलेल्या अविश्वसनीय विजयाचे कवित्व टिकून आहे. आता मालिकेत विजयी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाला शुक्रवारी होणाऱ्या चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यात प्रयोगाची संधी आहे.

मोहम्मद शमी आणि रोहितच्या पराक्रमामुळे भारताने न्यूझीलंडमध्ये प्रथमच ट्वेन्टी-२० मालिका जिंकत ३-० अशी आघाडी घेतली आहे. सामन्यांमधील दिवसांचे अंतर कमी असल्याने वेलिंग्टनपाठोपाठ रविवारी माऊंट माँगानूई येथे अखेरचा सामना खेळावा लागणार आहे. दोन्ही संघ गुरुवारी हॅमिल्टनहून वेलिंग्टनला दाखल झाले आहेत. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये क्वचितच होणाऱ्या पाच सामन्यांची मालिका निकाली ठरल्यामुळे आता ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टीने विविध क्रमबदलांना वाव आहे. परंतु प्रयोग आणि विजय यांचा समतोल राखणे आव्हानात्मक असेल. आता ट्वेन्टी-२० मालिकेत ५-० असे निभ्रेळ यश मिळवण्याचा निर्धार कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला आहे.

भारताने ११ जणांचा संघ कायम ठेवला तरी चालण्यासारखे आहे. कारण फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांतील महत्त्वाच्या स्थानांसाठीचे खेळाडू आपली चोख भूमिका  बजावत आहेत. संजू सॅमसन आणि ऋषभ पंत संधीच्या प्रतीक्षेत आहेत. पंतला संघात स्थान दिल्यास कोणत्या फलंदाजाला विश्रांती द्यावी, हे गणित कठीण आहे. या परिस्थितीत एल. के. राहुलकडेच यष्टिरक्षणाची जबाबदारी कायम राखावी का, हा आणखी एक पेचप्रसंग असेल.

रोहित किंवा विराटला विश्रांतीची शक्यता

रोहित, राहुल आणि विराट हे आघाडीचे तीन फलंदाज भारताच्या धावसंख्येत महत्त्वाचे योगदान देत आहेत. चौथ्या क्रमांकावरील श्रेयस अय्यरसुद्धा दिमाखात फलंदाजी करीत आहे. पुढील दोन सामन्यांत सुरुवातीच्या चार फलंदाजांपैकी कुणालाही विश्रांती दिली जाऊ शकते. रोहित किंवा विराटलाही विश्रांती मिळू शकते. त्यामुळे अन्य खेळाडूंना अजमावता येऊ शकेल. मनीष पांडे आणि शिवम दुबे यांना आणखी काही सामन्यांच्या सरावाची आवश्यकता आहे.

ग्रँडहोमच्या जागी ब्रूसचा समावेश

न्यूझीलंड संघात कॉलिन डी ग्रँडहोमच्या जागी टॉम ब्रूसचा समावेश होईल. मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यांत न्यूझीलंड संघाची मधली फळी अपयशी ठरली आहे. तिसऱ्या सामन्यातील झंझावाती खेळीनंतर कर्णधार केन विल्यम्सनला सलामीला उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. विल्यम्सन मार्टिन गप्टिलसह सलामीला उतरल्यास कॉलिन मुन्रो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. बुधवारी मिशेल सँटनरला चौथ्या क्रमांकावर पाचारण केले होते. परंतु ही रणनीती अपयशी ठरली होती.

सैनी, सुंदरला संधी?

गोलंदाजीच्या माऱ्यात बदल अपेक्षित आहेत. वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि नवदीप सैनी संधीसाठी उत्सुक आहेत. संघ व्यवस्थापन फिरकी आणि वेगवान माऱ्यात एकेक बदल करू शकेल. सुंदर ऑस्ट्रेलियाच्या मोठय़ा मैदानांवर नवा चेंडू योग्य पद्धतीने हाताळू शकतो, अशी विराटला खात्री आहे. सुंदरमुळे तळाच्या फलंदाजीच्या फळीत बळ मिळू शकते. त्यामुळे पुढील दोन सामन्यांत त्याला संधी मिळाल्यास आश्चर्य वाटू नये. शार्दूल ठाकूरच्या जागी सैनीला स्थान मिळू शकेल. तिसऱ्या सामन्यात भरवशाचा जसप्रित बुमरा महागडा ठरला होता. त्यामुळे आगामी कसोटी आणि एकदिवसीय मालिकांच्या पार्श्वभूमीवर बुमरालाही विश्रांती दिली जाऊ शकते. २०१९च्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक स्पर्धेनंतर बुमरा, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंडय़ा या तिघांनाही मोठय़ा दुखापती झाल्या होत्या. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने खेळाडूंच्या जोखमीचा मुद्दा ऐरणीवर असेल.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल (यष्टिरक्षक), मनीष पांडे, ऋषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगेलेइन, कॉलिन मुन्रो, कॉलिन डी ग्रँडहोम, टॉम ब्रूस, डॅरेल मिचेल, मिशेल सँटनर, टिम सेफर्ट (यष्टिरक्षक), हॅमिश बेनेट, ईश सोधी, टिम साऊदी, ब्लेअर टिकनर.

’ वेळ : दुपारी १२.३० वाजल्यापासून

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 1:18 am

Web Title: new zealand india fourth t20 match to be play today in wellington zws 70
Next Stories
1 ऑलिम्पिकआधी राष्ट्रकुल पात्रतेचे दियाचे ध्येय
2 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : बावणे-गुगळेच्या अर्धशतकांमुळे महाराष्ट्राचा दणदणीत विजय
3 फुटबॉलपटू बाला देवी युरोपमधील क्लबशी करारबद्ध
Just Now!
X