भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी हे वर्ष चांगलचं ठरताना दिसतं आहे. सर्वात आधी श्रीकांत किदम्बीने इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. त्यानंतर एच.एस.प्रणॉयने अमेरिकन ओपन स्पर्धा आपल्या खिशात घातली, याच स्पर्धेत भारताचा परुपल्ली कश्यप याने उपविजेतपद पटकावलं होतं. यानंतर आता न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपला हाच फॉर्म कायम ठेवला आहे.

एच.एस.प्रणॉय आणि परुपल्ली कश्यप यांनी आपपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. २४ वर्षीय प्रणॉयने इंडोनेशियाच्या अब्दुल खोलिकचं आव्हान २३-२१, २१-१८ अशा सरळ दोन सेट्समध्ये मोडून काढलं. तर दुसरीकडे परुपल्ली कश्यपने न्यूझीलंडच्या ऑस्कर गुओचं आव्हान २१-९, २१-८ असं मोडीत काढलं. पुढच्या फेरीत प्रणॉयसमोर हाँगकाँगच्या वेई नॅनचं आव्हान असणार आहे तर कश्यपची लढत ही भारताच्यात सौरभ वर्मासोबत होणार आहे.

सौरभने इंडोनेशियाच्या हेन्रीखो विबोवोला २१-१६, २१-१६ असं पराभूत करुन पुढच्या फेरीत प्रवेश केला. त्यामुळे सौरभ आणि कश्यपचा आगामी फेरीतला सामना हा पाहण्यासारखा होईल यात काही शंका नाही. याव्यतिरीक्त भारताच्या सिरील वर्माने इंडोनेशियाच्या सापुतारा विकी अंगाचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला. त्यामुळे या स्पर्धेत आता भारतीय बॅडमिंटनपटू चांगली कामगिरी करुन अंतिम फेरी गाठतात का हे पहावं लागणार आहे.