२०१९ विश्वचषक न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारताविरुद्ध सामन्यात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय फसला. मार्टीन गप्टील आणि निकोलस हेन्री या सलामीवीरांना जखडवून ठेवत भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला मोठे फटके खेळू दिले नाहीत. परिणामी न्यूझीलंडचा संघ पहिल्या पॉवरप्लेमध्ये केवळ २७ धावा करु शकला. २०१९ विश्वचषक स्पर्धेत पॉवरप्लेमधील ही सर्वात निचांकी धावसंख्या ठरली आहे.

न्यूझीलंडआधी भारताच्या संघाने या स्पर्धेत सर्वात कमी धावसंख्येची नोंद केली होती. इंग्लंडविरुद्ध सामन्यात भारतीय फलंदाजांनी पहिल्या १० षटकांमध्ये एक गडी गमावत २८ धावा केल्या होत्या. मार्टीन गप्टील आजच्या सामन्यातही फलंदाजीमध्ये चमक दाखवण्यात अपयशी ठरला. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर केवळ १ धाव काढून गप्टील माघारी परतला. यानंतर कर्णधार विल्यमसनने खेळपट्टीवर तग धरत संघाचा डाव सावरला.

अवश्य वाचा – World Cup 2019 : दोन विश्वचषक स्पर्धा आणि मार्टीन गप्टीलची अधोगती