बांगलादेशविरूद्धच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघाने आपला संघ जाहीर केला आहे. या संघामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंना समाविष्ट करण्यात आलेले नाही. कर्णधार केन विल्यमसन, ट्रेंट बोल्ट, काईल जेमीसन, जिमी नीशम आणि टिम सेफर्ट हे खेळाडू या टी-20 मालिकेत भाग घेणार नाहीत.

पुढच्या महिन्यात आयपीएल सुरू होणार आहे. यासाठीच या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. फिन एलेन आणि विल यंग यांचा पहिल्यांदाच संघात समावेश करण्यात आला आहे, तर लॉकी फर्ग्युसन आणि अ‍ॅडम मिलने यांनीही दुखापतीनंतर पुनरागमन केले आहे.

फिन एलेनचे सुपर स्मॅश स्पर्धेत शानदार प्रदर्शन

फिनने न्यूझीलंड सुपर स्मॅश स्पर्धेत शानदार प्रदर्शन केले होते. म्हणूनच त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने 11 सामन्यात 56.89च्या सरासरीने आणि 193.94 च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने 512 धावा केल्या. या काळात त्याने सहा अर्धशतके ठोकली. सुपर स्मॅश हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. आरसीबीने फिन एलनचा त्यांच्या संघात समावेश केला आहे.

साऊदी संघाचा कर्णधार

केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज टीम साऊदी संघाचा कर्णधार असेल. ईश सोधी आणि मार्टिन गुप्टिलसारखे दिग्गज खेळाडू या संघाचा भाग आहेत. एकदिवसीय मालिका सध्या न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात खेळली जात असून त्यानंतर टी-20 मालिका होणार आहे.

न्यूझीलंडचा संघ

टिम साऊदी (कर्णधार), फिन एलन, टॉड एश्ले, हमीश बेनेट, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे (विकेटकीपर), लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, अ‍ॅडम मिलने, डॅरेल मिशेल, ग्लेन फिलिप्स, ईश सोधी आणि विल यंग.