टॉम लॅथमचं संयमी शतक आणि त्याला रॉस टेलरने दिलेली भक्कम साथ या जोरावर पाहुण्या न्यूझीलंड संघाने पहिल्या वन-डे सामन्यात भारतावर ६ गडी राखून मात केली. या विजयासोबत न्यूझीलंडने ३ सामन्यांच्या वन-डे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने दिलेलं २८१ धावांचं लक्ष्य न्यूझीलंडने ४ गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केलं. पहिले ३ गडी माघारी धाडल्यानंतर भारत सामन्यात बाजी मारेल असा अंदाज सर्वांनी व्यक्त केला होता. मात्र लॅथम आणि टेलरने भारताच्या सर्व आशांवर पाणी फिरवलं. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी केली. अखेरच्या षटकांत टेलरला बाद करण्यात भारताला यश आलं, मात्र तोपर्यंत सामना भारताच्या हातून निसटला होता.

भारताकडून या सामन्यात युझवेंद्र चहलचा अपवाद वगळता सर्व गोलंदाजांना प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. मात्र मोक्याच्या क्षणी न्यूझीलंडच्या फलंदाजांना माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. या मालिकेतला दुसरा सामना पुण्यात होणार आहे, त्यामुळे हा सामना जिंकून भारत मालिकेत बरोबरी साधतो का हे पहावं लागणार आहे.

  • पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडची भारतावर ६ गडी राखून मात, मालिकेत १-० ने आघाडी
  • विजयाची औपचारिकता टॉम लॅथम-हेन्री निकोलस जोडीकडून पूर्ण
  • रॉस टेलरचं शतक हुकलं, ९५ धावांवर भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर टेलर माघारी
  • टॉम लॅथमचं संयमी शतक, भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या
  • लॅथम, टेलरची अर्धशतकं, दोघांकडून भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई
  • दोघांमध्ये ४ थ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी, भारताचा संघ बॅकफूटवर
  • रॉस टेलर-टॉम लेथम जोडीने पाहुण्या संघाचा डाव सावरला
  • मात्र हार्दिक पांड्याने गप्टीलला माघारी धाडत न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला
  • गप्टील-टेलर यांच्याकडून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • कर्णधार विलियमसन कुलदीप यादवच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला, अवघ्या ६ धावा काढून माघारी
  • सलामीची जोडी फोडण्यात भारताला यश, बुमराहच्या गोलंदाजीवर मुनरो बाद
  • गप्टील- मुनरो जोडीची न्यूझीलंडकडून सावध सुरुवात, दोघांची पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी
  • न्यूझीलंडला विजयासाठी २८१ धावांचं आव्हान
  • मात्र अखेरच्या चेंडुवर भुवनेश्वर कुमार साउदीच्या गोलंदाजीवर बाद
  • अखेरच्या षटकात भुवनेश्वर कुमारचीही चौफेर फटकेबाजी
  • टीम साऊदीच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना कोहली बाद, भारताला सातवा धक्का
  • कोहलीच्या फटकेबाजीने भारताने ओलांडला २५० धावांचा टप्पा
  • मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात विल्यमसनच्या हाती झेल देत पांड्या माघारी, भारताला सहावा धक्का
  • हार्दिक पांड्याची दुसऱ्या बाजूने फटकेबाजी
  • कर्णधार विराट कोहलीचं झुंजार शतक, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
  • दोघांमध्येही पाचव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी, मात्र धोनीला बाद करण्याल बोल्टला यश
  • धोनीचीही कोहलीला उत्तम साथ, भारताने ओलांडली २०० ची धावसंख्या
  • न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर कोहलीचं आक्रमण, चौफेर फटकेबाजी
  • विराट कोहलीने पुन्हा महेंद्रसिंह धोनीच्या साथीने भारताचा डाव सावरला
  • टिम साऊदीच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिक माघारी
  • दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी, भारताची सामन्यावर पकड
  • कार्तिक-कोहली जोडीने भारताच्या धावसंख्येची गती वाढवली
  • कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक, भारताचा डाव सावरला
  • विराट कोहली आणि दिनेश कार्तिकमध्ये चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
  • भारताची धावसंख्या शंभरीपार, सामन्यावर भारताची पकड
  • यानंतर कोहलीने दिनेश कार्तिकच्या सहाय्याने भारताचा डाव सावरला
  • फिरकीपटू मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर केदार जाधव माघारी, भारताला तिसरा धक्का
  • विराट कोहली – केदार जाधवने भारताचा डाव सावरला, दोघांमध्येही ४२ धावांची भागीदारी
  • ट्रेंट बोल्टने रोहित शर्माचा त्रिफळा उडवत भारताला दुसरा धक्का दिला
  • रोहित शर्माचं दुसऱ्या बाजूने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर आक्रमण सुरुच, साऊदीच्या गोलंदाजीवर दोन लागोपाठ षटकार
  • मात्र ट्रेंट बोल्टने शिखर धवनचा अडसर दूर करत भारताला पहिला धक्का दिला
  • भारतीय डावाची सावध सुरुवात, रोहित-शिखर धवनची सावधरित्या फटकेबाजी
  • अजिंक्य रहाणेला संघात जागा नाही, शिखर धवन-रोहित शर्मा भारतीय डावाची सुरुवात करणार
  • नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय