वन-डे मालिकेपाठोपाठ भारताने न्यूझीलंडला टी-२० मालिकेतही पराभवाचा धक्का दिला आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर ८ षटकांत ६८ धावांचं आव्हान ठेवलं. मात्र हे आव्हान पूर्ण करणं पाहुण्या संघाला जमलं नाही. अखेर भारताने अखेरच्या सामन्यात ६ धावांनी विजय मिळवत मालिका २-१ च्या फरकाने खिशात घातली. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांचा फॉर्म पाहता, हे आव्हान ते सहज पार करतील असा अंदाज सर्वांनी बांधला होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना एकामागोमाग एक धक्के दिले. दुसऱ्या सामन्यात शतक झळकावणारा कॉलिन मुनरोही या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. त्यामुळे अखेरच्या दोन षटकांत न्यूझीलंडसमोर खडतर आव्हान निर्माण झालं.

शेवटच्या षटकांत न्यूझीलंडचे फलंदाज हाणामारी करुन सामना आपल्याकडे खेचून आणतील असं वाटत असतानाच, महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडण्यात भारताचे गोलंदाज यशस्वी झाले. अखेरच्या षटकात १९ धावा शिल्लक असताना न्यूझीलंडच्या तळातल्या फलंदाजांनी विजयासाठी प्रयत्न केले, मात्र भारतीय गोलंदाजांसमोर त्यांना हार मानावीच लागली.

  • अखेरच्या सामन्यात भारताची न्यूझीलंडवर ६ धावांनी मात, मालिका २-१ च्या फरकाने खिशात घातली
  • सातव्या षटकात न्यूझीलंडचा आणखी एक खेळाडू माघारी, भारताची सामन्यावर पकड
  • हेन्री निकोलसला बुमराहने धाडलं माघारी, न्यूझीलंडला पाचवा धक्का
  • न्यूझीलंडला आणखी एक धक्का, चहलच्या गोलंदाजीवर ग्लेन फिलीप्स माघारी
  • चोरटी धाव घेण्याच्या नादात कर्णधार विलियमसन माघारी
  • दुसऱ्या सामन्यात शतक झळकावणारा कॉलिन मुनरोही माघारी, न्यूझीलंडला दुसरा धक्का
  • भारतीय गोलंदाजांची आश्वासक सुरुवात, भुवनेश्वरने उडवला गप्टीलचा त्रिफळा
  • न्यूझीलंडसमोर ६८ धावांचं आव्हान
  • मनिष पांडेला बाद करण्यात न्यूझीलंडला यश, भारताला पाचवा धक्का
  • अखेरच्या षटकांत पांड्या, मनिष पांडेची फटकेबाजी, भारताने ओलांडला ५० धावांचा टप्पा
  • भारतीय संघाची घसरगुंडी सुरुच, श्रेयस अय्यर मोठा फटका खेळण्याच्या नादात माघारी
  • मात्र ईश सोधीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात विराट कोहली माघारी
  • विराट कोहलीकडून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न
  • टीम साऊदीच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा, शिखर धवन मिचेल सँटनरकडे झेल देत माघारी
  • भारताच्या सलामीवीरांकडून पुन्हा निराशा
  • खेळपट्टीची पाहणी करुन सामन्याधिकाऱ्यांचा ८-८ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय
  • पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याला उशीरा सुरुवात