न्यूझीलंडने दिलेलं २३१ धावांचं आव्हान ४ गड्यांच्या मोबदल्यात पार करत भारताने पुण्याच्या गहुंजे स्टेडीयमवर खेळवण्यात आलेल्या वन-डे सामन्यात विजय मिळवलेला आहे. या विजयासह भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या सामन्याच्या सुरुवातीला पिच फिक्सिंगचं प्रकरण समोर आलं, त्यामुळे हा सामना होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं. मात्र आयसीसीने खेळपट्टीचं परीक्षण करुन सामन्याला आपला हिरवा कंदील दाखवला. पहिले फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी २३० धावांवर रोखलं.

यानंतर हे आव्हान भारत सहज पार करेल असं वाटत असताना सलामीवीर रोहित शर्माने या सामन्यातही निराशा केली. अवघ्या ७ धावा काढून रोहित शर्मा माघारी परतला. यानंतर कोहलीही बाद झाल्यामुळे सामन्यात न्यूझीलंड पुनरागमन करतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. मात्र शिखर धवन आणि दिनेश कार्तिकने संयमी अर्धशतकी खेळी करत भारताचा विजय निश्चीत केला. सध्या ही मालिका १-१ अशा बरोबरीत असल्याने कानपूरच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

  • विजयाची औपचारिकता दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंह धोनी जोडीकडून पूर्ण
  • विजय दृष्टीपथात आलेला असताना भारताला चौथा धक्का, हार्दिक पांड्या माघारी
  • दोघांमध्येही चौथ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी, दिनेश कार्तिकचं संयमी अर्धशतक
  • कार्तिक-पांड्या जोडीने भारताला २०० धावसंख्येचा टप्पा गाठून दिला
  • ६८ धावसंख्येवर शिखर धवन माघारी, भारताला तिसरा धक्का
  • दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी, शिखर धवनचं झुंजार अर्धशतक
  • कोहली बाद झाल्यानंतर शिखरने दिनेश कार्तिकच्या साथीने भारतीय संघाचा डाव सावरला
  • विराटला बाद करत कॉलिन डी ग्रँडहोमचा भारताला दुसरा धक्का
  • शिखर धवन-विराट कोहलीने भारताचा डाव सावरला, दोघांमध्ये ५७ धावांची भागीदारी
  • भारताची अडखळती सुरुवात, रोहित शर्मा अवघ्या ७ धावा काढून माघारी
  • भारतासमोर दुसऱ्या वन-डे सामन्यात २३१ धावांचं आव्हान
  • मिचेल सँटनर बुमराहच्या गोलंदाजीवर बाद, न्यूझीलंडला नववा धक्का
  • भारतीय आक्रमणासमोर न्यूझीलंडची अवस्था बिकट
  • पाठोपाठ चहलच्या गोलंदाजीवर मिलने पायचीत होऊन माघारी
  • कॉलिन डी-ग्रँडहोमला माघारी धाडत भारताचा न्यूझीलंडला सातवा धक्का
  • हेन्री निकोलसचा त्रिफळा उडवत भुवनेश्वरचा न्यूझीलंडला सहावा धक्का, दोघांमध्ये ४७ धावांची भागीदारी
  • कॉलिन डी-ग्रँडहोम आणि निकोलस जोडीने पुन्हा संघाचा डाव सावरला, मात्र धावगती वाढवण्यात दोघांना अपयश
  • लॅथमचा त्रिफळा उडवत अक्षर पटेलचा न्यूझीलंडला पाचवा धक्का
  • दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी, पाहुण्या संघाने ओलांडला १०० धावांचा टप्पा
  • लॅथम-निकालस जोडीने न्यूझीलंडच्या संघाचा डाव सावरला
  • भारतीय जलदगती गोलंदाजांचा सुरुवातीच्या षटकांमध्ये टिच्चून मारा
  • पहिल्या सामन्यांत आक्रमक खेळी करणारा रॉस टेलरही माघारी, न्यूझीलंडला चौथा धक्का
  • ठराविक अंतराने कॉलिन मुनरो भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत, भारत सामन्यात वरचढ
  • सलग दुसऱ्या सामन्यात कर्णधार केन विलियमसन अपयशी, बुमराहच्या गोलंदाजीवर पायचीत
  • गप्टील-मुनरो जोडीकडून निराशा, भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर गप्टील बाद
  • पहिल्या सामन्याच्या तुलनेत पुण्याच्या मैदानावर न्यूझीलंडची फलंदाजी कोलमडली
  • कुलदीप यादव ऐवजी अक्षर पटेलला संघात स्थान
  • न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय