ऑस्ट्रेलियावर मात केल्यानंतर विराट कोहलीच्या भारतीय संघाचा सामना आता न्यूझीलंडशी होतो आहे. ऑस्ट्रेलियाप्रमाणे फॉर्मात असलेला भारतीय संघ न्यूझीलंडलाही सहज हरवेल असा अंदाज सर्वांनी व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्ष मैदानात घडलं उलटचं. भारताने दिलेलं २८१ धावांचं आव्हान न्यूझीलंडच्या संघाने लिलया पार केलं. टॉम लॅथम आणि रॉस टेलर या जोडीने द्विशतकी भागीदारी करुन भारतीय आक्रमणातली हवाच काढून टाकली.

या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध आखलेल्या काही रणनिती पुरत्या फसल्या. ५ महत्वाच्या कारणांमुळे भारताला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

१) लॅथम-टेलर जोडीची अभेद्य द्विशतकी भागीदारी –

२८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असलेल्या न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात काहीशी अडखळती झाली. त्यांचे सलामीचे ३ फलंदाज हे अवघ्या ८० धावांत माघारी परतले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाप्रमाणे न्यूझीलंडचा संघही कोलमडणार अशी गत झालेली असताना रॉस टेलर आणि टॉम लॅथम जोडीने भारताच्या मनसुब्यांवर पाणी फिरवलं.

दोन्ही फलंदाजांनी भारतीय आक्रमणांचा संयमाने सामना करत आपल्या संघाचा डाव सावरला. या जोडीने चौथ्या विकेटसाठी २०० धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्यासाठी विराट कोहलीने प्रयत्नांची पराकाष्टा केली, मात्र त्याला या प्रयत्नात अपयश आलं.

२) ट्रेंट बोल्टवर आक्रमण करण्याचा प्रयत्न फसला –

रोहित शर्मा आणि शिखर धवन हे भारताचे सलामीवीर आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. यावेळी न्यूझीलंडच्या गोलंदाजीतलं महत्वाचं अस्त्र म्हणून ओळखला जाणारा ट्रेंट बोल्टवर आक्रमण करण्याची व्यूहरचना भारतीय सलामीवीरांनी आखली होती. यानूसार दोनही फलंदाजांनी बोल्टविरुद्ध काही सुरेख फटके खेळले. मात्र मोठे फटके खेळण्याच्या नादात दोनही फलंदाजांनी आपल्या विकेट फेकल्या.त्यामुळे न्यूझीलंडच्या प्रमुख अस्त्रावर हल्ला करण्याचा भारताचा प्रयत्न त्यांच्यात अंगलट आला.

३) भारताने हातातून सामना निसटू दिला –

सलामीच्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यानंतर विराट कोहलीने एका बाजूने भारताची बाजू लावून धरली. यादरम्यान एखादी मोठी भागीदारी भारताचा डाव सावरु शकली असती, मात्र एकाही खेळाडूने मैदानात तग धरुन राहणं पसंत केलं नाही. दिनेश कार्तिक आणि केदार जाधव यांनी मधल्या काळात काही काळ विराट कोहलीसोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही बाद करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सामन्यावर आपली पकड कायम ठेवली.

४) महत्वाच्या क्षणी कार्तिक आणि धोनी बाद –

७१-३ अशी अवस्था असताना दिनेश कार्तिकने विराट कोहलीच्या साथीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कोहली आणि कार्तिकमध्ये चौथ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारीही झाली. मात्र ३७ धावसंख्येवर टीम साऊदीने दिनेश कार्तिकला माघारी धाडत भारताची जोडी फोडली.

यानंतर मधल्या फळीतला सर्वात आश्वासक फलंदाज म्हणून ओळख असलेला महेंद्रसिंह धोनी भारताचा डाव सावरेल असं वाटत होतं. मात्र ठराविक अंतराने ४१ व्या षटकात धोनीही माघारी परतला. मोक्याच्या क्षणी भारताला हे दोन धक्के बसल्याने त्यांना आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही.

५) मधल्या षटकांमध्ये भारताचे फिरकीपटू अपयशी –

रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजा यांच्या अनुपस्थितीत कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनी भारतीय संघाच्या फिरकीची कमान चांगली सांभाळली. श्रीलंका दौऱ्यापासून ते ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत या दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत सर्वांना आपली दखल घेणं भाग पाडलं. मात्र न्यूझीलंडविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यात हे दोन्ही गोलंदाज अयशस्वी ठरले. कुलदीप यादवने केन विलियमसनला माघारी धाडत एक विकेट मिळवली, मात्र मधल्या षटकांमध्ये टेलर-लॅथम जोडी फोडणं दोघांनाही जमलं नाही.