News Flash

न्यूझीलंड-बांगलादेश टी-२० मॅचमध्ये विचित्र प्रकार, विजयी लक्ष्य माहित नसतानाही बॅटिंगसाठी उतरले ओपनर

बांगलादेशच्या फलंदाजीला सुरूवात झाली तरी विजयासाठी किती धावा करायच्यात याबाबत सलामीवीरांना नव्हती कल्पना

( फोटो- ट्विटर)

न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात विचित्र प्रकार बघायला मिळाला. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात बांगलादेशचा संघ फलंदाजीला उतरला त्यावेळी आपल्याला जिंकण्यासाठी किती धावा हव्यात याचीच त्यांच्या सलामीवीरांना कल्पना नव्हती. मंगळवारी नेपियरमध्ये झालेल्या या सामन्यात बांगलादेशचे सलामीवीर विजयी आव्हानाबाबत पुरते गोंधळलेले दिसले.

बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा बॅटिंग करताना न्यूझीलंडने 17.5 षटकात 5 विकेट गमावून 173 धावा केल्या होत्या. पण त्याचवेळी पाऊस सुरू झाला, पावसामुळे न्यूझीलंडचा डाव पूर्ण झाला नाही. पावसाचा व्यत्यय आल्यानंतर क्रिकेट सामन्यात डकवर्थ-लुईस नियम वापरला जातो आणि नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला सुधारीत लक्ष्य दिलं जातं. पण, या सामन्यात बांगलादेशच्या फलंदाजीला सुरूवात झाली तरी विजयासाठी किती धावा करायच्यात याबाबत गोंधळ होता. तीन-चार चेंडूंनतर त्यांना विजयासाठी 16 षटकात 148 धावा करायच्या असल्याचं सांगण्यात आलं. पण इथेच मोठा ‘ट्विस्ट’ आला.


न्यूझीलंडचा हॅमिश बॅनेट डावातील दुसरं षटक टाकत होता. त्याने तीन चेंडू टाकल्यानंतर मॅच रेफ्री जेफ क्रो यांनी खेळ पुन्हा थांबवला. त्यानंतर मात्र बांगलादेशला जिंकण्यासाठी नवं लक्ष्य देण्यात आलं. 16 षटकात 170 धावांचं लक्ष्य त्यांना मिळालं. अखेरीस बांगलादेशचा संघ सात गडी गमावून 142 धावाच बनवू शकला. यासोबतच सामना आणि मालिकाही 0-2 अशी त्यांनी गमावली. सामन्यानंतर न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिम्मी नीशम यानेही या विचित्र घटनेवर आश्चर्य व्यक्त केलं. विजयी लक्ष्य माहित नसताना धावांचा पाठलाग सुरूच कसा होऊ शकतो? असा सवाल त्याने ट्विटरद्वारे विचारला. दरम्यान, डकवर्थ-लुईस नियमामुळे क्रिकेटच्या मैदानात घडलेली ही विचित्र घटना सध्या चांगलीच चर्चेत आहे. यापूर्वीही डकवर्थ-लुईस नियमाचा अनेक संघांना फटका बसला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 10:02 am

Web Title: new zealand vs bangladesh play halted in 2nd t20i due to confusion in revised target sas 89
Next Stories
1 ऑलिम्पिकचे आयोजन धोक्याचे!
2 हरमनप्रीतला करोनाची लागण
3 रोहित-धवनच सलामीसाठी उत्तम!
Just Now!
X