पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार केन विल्यमसनच्या द्विशतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडनं आपला डाव ५१९ धावांवर घोषीत केला. विडिंजचा कर्णधार जेसन होल्डरनं गुरुवारी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली आणि अवघ्या १४ धावांवर विडिंडनं पहिला धक्का दिला. सलामीवीर विल यंग (५ धावा) याला वेगवान गोलंदाज गब्रीएलने पायचीत केले. त्यानंतर विल्यमसन आणि टॉम लेथम यांनी संयमी फलंदाजी करत डाव सावरला.

लेथम आणि विलियम्सन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी केली. पहिला दिवसअखेर न्यूझीलंडनं दोन गड्यांच्या मोबदल्यात २४३ धावा केल्या होत्या. विलियम्सन ९७ धावांवर नाबाद होता. कर्णधार केन विल्यमसन यानं २५१ धावांची संयमी द्विशतकी खेळी करत सामन्यावर पकड मिळवली. केन विल्यमसनचं हे कारकिर्दितील तिसरं द्विशतक आहे. विल्यमसनशिवाय लॅथमनं ८६ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. विडिंजकडून केमर रोच आणि गॅब्रियल यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले आहेत.

विल्यमसनचं कर्णधार म्हणून नववे शतक होते. या शतकासह न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून त्याने सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगला मागे टाकलं. फ्लेमिंगच्या नावावर ८ शतकांची नोंद आहे.