वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर एखादा विक्रम झाला असेल तर… होय अगदी खरंय. सहा वर्षांपूर्वी न्यूझीलंड विरूद्ध वेस्ट इंडिज सामन्यात १८ वर्षापूर्वीचा विक्रम मोडण्यात आला. सर्वात वेगवान शतक पटकावण्याचा विक्रम सहा वर्षांपूर्वी मोडला. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कॉरी अँडरसन यानंतर चर्चेत आला होता. त्यानं १८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा मान मिळवला होता.

वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात कॉरी अँडरसननं ३६ चेंडूंचा सामना करत वेगवान शतक ठोकण्याचा मान पटकावला होता. यापूर्वी या विक्रम पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिदी आफ्रिदीच्या नावे नोंदवण्यात आला होता. १९९६ मध्ये श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यात २१ वर्षीय शाहिदी आफ्रिदीनं ३७ चेंडूंमध्ये शतक झळकावलं होतं.

अँडरसननं २० चेंडूंमध्ये ५० धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढील १६ चेंडूंमध्ये ५० धावा करत त्यानं शतक ठोकलं होतं. पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या अँडरसननं ४७ चेंडूंमध्ये नाबाद १३१ धावा केल्या होत्या. त्यानं १४ षटकारांच्या साहाय्यानं १३१ धावा केल्या होत्या. यापूर्वी रोहित शर्माचा एका इनिंगमधील १६ षटकारांचा विक्रम तोडण्यास त्याला अपयश आलं होतं. परंतु २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक सामन्यादरम्यान इयॉन मॉर्गननं अफगाणिस्तान विरोधात एका इनिंगमध्ये १७ षटकार मारत रोहित शर्माचा विक्रम मोडला होता.

परंतु कॉरी अँडरसनचा विक्रम जास्त काळ टिकू शकला नाही. जानेवारी २०१५ मध्ये एबी डिविलिअर्सनं जोहान्सबर्गमध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या सामन्यात ३१ चेंडूंमध्ये शतक झळकावलं होतंय. त्याचा विक्रम अद्याप कोणालाही मोडता आलेला नाही.

कोणी पटकावली होती वेगवान शतकं?
एबी डिविलिअर्स (द. आफ्रिका) : ३१ चेंडूंमध्ये शतक ( १८.१.२०१५)
कॉरी अँडरसन (न्यूझीलंड) : ३६ चेंडूंमध्ये शतक (१.१.२०१४)
शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) : ३७ चेंडूंमध्ये शतक (४.१०.१९९६)