कोरे अँडरसन आणि कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलम यांची अर्धशतके आणि मिचेल मॅक्लेघानच्या चार बळींच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये श्रीलंकेवर तीन विकेट्सने विजय मिळवला. ८१ धावांची खेळी साकारणाऱ्या अँडरसनला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या विजयासह न्यूझीलंडने सात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांना जास्त काळ खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही, याला अपवाद ठरला तो फक्त महेला जयवर्धने. १२ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर जयवर्धनेने १०४ धावांची खेळी साकारल्यामुळे श्रीलंकेला २१८ धावा करता आल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नव्हती. पण मॅक्क्युलमने २२ चेंडूत ६ चौकार आणि तीन षटकांच्या जोरावर ५१ धावांची खेळी साकारली. पण तो बाद झाल्यावर न्यूझीलंडचा संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडला असताना अँडरसनने ११ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ८१ धावांची खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला.