अचूक रणनिती, संघातील खेळाडूंची योग्य निवड, प्रतिस्पर्ध्यांच्या कमकुवत बाजूंची माहिती आणि हवामानाचा अभ्यास या सर्व घटकांच्या जोरावर न्यूझीलंडने बलाढ्य भारताला ८ गड्यांनी पराभूत करत पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले. या सामन्याचा पहिला आणि चौथा दिवस पावसामुळे वाया गेला. नाणेफेक जिंकलेल्या न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पहिल्या डावात भारताला २१७ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने भारताला जखडून ठेवत १७० धावांवर गुंडाळले. राखीव दिवसापर्यंत रंगलेल्या या सामन्यात न्यूझीलंडला भारताकडून ५३ षटकात १३९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. लॅथम आणि कॉन्वे लवकर माघारी परतल्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी दमदार फलंदाजी करत न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात २ बळी घेणाऱ्या न्यूझीलंडच्या काईल जेमीसनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

न्यूझीलंडचा दुसरा डाव

सलामीवीर फलंदाज टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी न्यूझीलंडकडून राखीव दिवसाच्या चहापानापर्यंत सावध सुरुवात केली. चहापानानंतर विराटने अश्विनच्या हातात चेंडू सोपवला. त्याने सलामीवीर फलंदाज टॉम लॅथमला वैयक्तिक ९ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर अश्विनने डेव्हॉन कॉन्वेला पायचित पकडत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. पहिल्या डावात अर्धशतक झळकावलेला कॉन्वे या डावात १९ धावा काढू शकला. यानंतर रॉस टेलर आणि केन विल्यमसन यांनी संघाला आधार दिला. एकेरी दुहेरी, मध्येच चौकार असा मेळ घालत दोघांनी भारताच्या गोलंदाजीला निष्प्रभ केले. ३१व्या षटकात चेतेश्वर पुजाराने रॉस टेलरला जीवदान दिले. बुमराहने टाकलेल्या चेंडूवर पुजाराने टेलरचा सोपा झेल सोडला. टेलर तेव्हा २७ धावांवर खेळत होता. विल्यमसन आणि टेलरने ३६व्या षटकात आपली अर्धशतकी भागीदारी आणि ३७व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले. यानंतर दोघांनी विजयासाठी अपेक्षित असलेल्या धावांचे अंतर कमी करत भारतावर दबाव वाढवला. दरम्यान विल्यमसनने अर्धशतक पूर्ण केले. रॉस टेलरने विजयी चौकार खेचत न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. विल्यमसनने ८ चौकारांसह नाबाद ५२ तर टेलरने ६ चौकारांसह ४७ धावांची मौल्यवान खेळी केली.

 

हेही वाचा – ‘‘लवकरच तू सलमान खान होशील”, वर्कआउटचा व्हिडिओ पाहून इंग्लिश क्रिकेटरनं केलं चहलला ट्रोल

भारताचा दुसरा डाव (राखीव दिवस)

पाचव्या दिवसअखेर २ बाद ६४ धावांवरून पुढे खेळणाऱ्या भारताने उपाहारापर्यंत विराट कोहली (१३), चेतेश्वर पुजारा (१५) आणि अजिंक्य रहाणेला (१५) गमावले.  हे स्टार खेळाडू स्वस्तात माघारी परतल्यानंतर ऋषभ पंतने टीम इंडियाचा डाव सांभाळला. उपाहारापर्यंत भारताने ५५ षटकात ५ बाद १३० धावा केल्या. उपाहारानंतर पंतसोबत खेळपट्टीवर उभ्या राहिलेल्या रवींद्र जडेजाला नील वॅगनरने तंबूचा रस्ता दाखवला. जडेजाने १६ धावा केल्या. यष्टीपाठी वॉटलिंगने जडेजाचा झेल घेतला. ७०व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या नादात ऋषभ पंत झेलबाद झाला. बोल्टच्या गोलंदाजीवर तो वैयक्तिक ४१ धावांवर माघारी परतला. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार ठोकले. पंतनंतर बोल्टने अश्विनला टेलरकरवी झेलबाद केले. त्याने ७ धावा केल्या. यानंतर मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताच्या शेपटाकडील फलंदाजांना जास्त वळवळू दिले नाही. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात टिम साऊदीने ४८ धावांत सर्वाधिक ४ बळी घेतले. बोल्टने ३, जेमीसनने २ तर नील वॅगनरने १ बळी घेतला.

संक्षिप्त धावफलक

  • नाणेफेक – न्यूझीलंड (गोलंदाजी)
  • भारत पहिला डाव – सर्वबाद २१७ (विराट कोहली ४४, अजिंक्य रहाणे ४९,  काईल जेमीसन ५/३१)
  • न्यूझीलंड पहिला डाव – सर्वबाद २४९ (डेव्हॉन कॉन्वे ५४, केन विल्यमसन ४९, मोहम्मद शमी ४/७६)
  • भारत दुसरा डाव – सर्वबाद १७० (ऋषभ पंत ४१, टिम साऊदी ४/४८)
  • न्यूझीलंड दुसरा डाव – २ बाद १४०* (केन विल्यमसन ५२*, रॉस टेलर ४७* अश्विन २/१७) (न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी)