सुरक्षेच्या कारणास्तव मालिका खेळण्यास नकार; एकतर्फी निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट मंडळाची टीका

न्यूझीलंड क्रिकेट संघाने शुक्रवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पहिला चेंडू टाकण्यास काही तासांचा अवधी असताना पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. हा एकतर्फी निर्णय असल्याची टीका पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) केली आहे.

रावळपिंडी स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना वेळेवर चालू झाला नाही. दोन्ही संघ हॉटेलमध्येच थांबले होते. आता शनिवारी न्यूझीलंडचा संघ मायदेशी परतणार आहे.

‘‘खेळाडूंची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची असल्यामुळे अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. दौरा चालू ठेवणे अशक्य असल्याचा सल्ला आम्हाला देण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला,’’ असे न्यूझीलंड क्रिकेट संघटनेचे मुख्य कार्यकारी डेव्हिड व्हाइट म्हणाले. सुरक्षेच्या धोक्याबाबत मात्र भाष्य न्यूझीलंडच्या संघटनेने केले नाही.

‘‘पाकिस्तान क्रिकेट मंडळ आणि येथील सरकारकडून सर्व पाहुण्या संघांसाठी उत्तम सुरक्षा व्यवस्था करते. न्यूझीलंड क्रिकेट संघासाठीसुद्धा आम्ही याच पद्धतीने व्यवस्था राखली होती. परंतु न्यूझीलंडने मालिका लांबणीवर टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे,’’ असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून सांगण्यात आले. १८ वर्षांनंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिका खेळणार होता.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्तीश: न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डर्न यांच्याशी चर्चा करून पाहुण्या संघाला कोणत्याही प्रकारे सुरक्षेचा धोका नसल्याची हमी दिली. आमच्याकडे सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा असल्याचेही इम्रान यांनी सांगितले.

न्यूझीलंडने ‘आयसीसी’ला उत्तर द्यावे -राजा

न्यूझीलंडने पाकिस्तान दौऱ्यावरून माघारीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) उत्तर द्यावे, असे आवाहन ‘पीसीबी’चे प्रमुख रमिझ राजा यांनी केले आहे. ‘‘हा क्रिकेटसाठी अतिशय वाईट दिवस आहे. चाहत्यांची आणि खेळाडूंची मी माफी मागतो. सुरक्षेच्या धोक्याचे कारण देत मालिकेतून माघार घेण्याचा न्यूझीलंडचा एकतर्फी निर्णय हा अत्यंत निराशाजनक आहे. याबाबत आमच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. न्यूझीलंड कोणत्या जगात राहतात? न्यूझीलंडला ‘आयसीसी’कडे उत्तर द्यावे लागेल,’’ असे राजा यांनी सांगितले.

न्यूझीलंडकडून पाकिस्तानच्या क्रिकेटची हत्या -अख्तर

न्यूझीलंडने पाकिस्तानच्या क्रिकेटची नुकतीच हत्या केली, अशा शब्दांत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने तोफ डागली आहे. ‘‘ख्राइस्टचर्चच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या नऊ जणांना ठार केले होते, याचीही आठवण न्यूझीलंडने ठेवावी. न्यूझीलंडकडून मिळालेल्या वाईट वागणुकीचा निषेध व्यक्त करीत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांशी चर्चा करून सुरक्षेची दिलेली हमीसुद्धा फेटाळण्यात आली. पाकिस्तानमध्ये याआधी दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि पाकिस्तान सुपर लीगचे यशस्वी आयोजन केले आहे,’’ असे अख्तरने सांगितले.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेमुळे लक्षावधी पाकिस्तानी क्रिकेटरसिकांच्या चेहऱ्यावर आनंद परतणार होता. परंतु ती लांबणीवर पडणे, हे अतिशय निराशाजनक आहे.

-बाबर आझम, पाकिस्तानचा कर्णधार

२००९पासून क्रिकेट हद्दपार..

२००९मध्ये लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर बसमधून जाणाऱ्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात श्रीलंकेचे सहा खेळाडू जखमी झाले, तर पाकिस्तानच्या सहा पोलीस आणि दोन नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पाकिस्तानमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेट हद्दपार झाले.

२०१५पासून पुनरुज्जीवन

२०१५मध्ये झिम्बाब्वेच्या पाकिस्तान दौऱ्याने तेथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतले. मग काही छोटय़ा संघांनी पाकिस्तानचे दौरे केले. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेनंतर पाकिस्तानात इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचे संघ पुढील काही महिन्यांत येणार होते. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेचीही  योजना आहे.

इंग्लंडचाही दौऱ्याबाबत पुनर्विचार

लंडन : न्यूझीलंडने पाकिस्तान दौऱ्यावरून माघार घेतल्यानंतर काही तासांतच इंग्लंडच्या दौऱ्याबाबतही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या ४८ तासांत निर्णय घेणार असल्याचे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने गुरुवारी सांगितले. इंग्लंडचा संघ दोन ट्वेन्टी-२० सामन्यांची (१३ आणि १४ ऑक्टोबर) मालिका खेळण्यासाठी रावळपिंडीला जाणार होता. २००५नंतर त्यांचा हा पहिलाच दौरा होता.