न्यूझिलंडच्या महिला क्रिकेट संघाने आज इतिहास रचला. महिलांच्या या संघाने ४ गडी गमावून ५० षटकांच्या बदल्यात ४९० धावांचा विक्रम केला. आयर्लंड विरोधात खेळताना त्यांनी हा विक्रम केला. क्रिकेट हा जंटलमन्स गेम मानला जातो.. मात्र न्यूझिलंडच्या महिला संघाने हम किसीसे कम नहीं म्हणत ४९० धावा केल्या. कॅप्टन सुझी बॅट्स, फलंदाज मॅडी ग्रीन या दोघींची खेळी तर डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली. न्यूझिलंडच्या महिला क्रिकेट संघाने त्यांच्याच संघाचा ४५५ धावांचा रेकॉर्डही या खेळीमुळे मोडित काढला. १९९७ मध्ये पाकिस्तानविरोधात खेळताना न्युझिलंडच्या संघाने ५ गडी गमावून ४५५ धावा केल्या होत्या. मात्र त्यावेळचा विक्रमही आज मोडित निघाला.

सुझी बॅट्सने ९४ चेंडूंचा सामना करत १५१ धावांचा पाऊस पाडला. तर मॅडी ग्रीनने तिला साजेशी साथ देत ७७ चेंडूत १२१ धावा केल्या. इंग्लंडच्या पुरुषांच्या संघाने २०१६ मध्ये पाकिस्तानविरोधात ४४४ धावा केल्या होत्या तो विक्रमही या महिलांनी मोडून काढला. आजवर पुरुषांच्या क्रिकेट संघाला जे जमले नाही ते न्यूझिलंडच्या महिला संघाने करून दाखवले. आयर्लंडविरोधात शुक्रवारी न्युझिलंडच्या महिला संघाची पहिली ODI होती. या सामन्यात टॉस जिंकून न्युझिलंडच्या महिला संघाने फलंदाजी स्वीकारली त्यानंतर सुझी बॅट्सने ९४ चेंडूंमध्ये २४ चौकार, २ षटकार ठोकत १५१ धावा केल्या. जेस वॅटकिनने ५९ चेंडूंमध्ये ६२ धावांची खेळी केली. मॅडी ग्रीनने ७७ चेंडूंमध्ये १५ चौकार आणि १ षटकार लगावत १२१ धावा कुटल्या. अॅमी सॅटर्सवेईट २१ धावांवर बाद झाली. तर अमेला केरने ४५ चेंडूंमध्ये ८१ धावा केल्या तिने ९ चौकार आणि ३ षटकार लगावले. या सगळ्यांच्या खेळीमुळे न्युझिलंडच्या महिला संघाला ४९० धावांचा डोंगर उभारता आला. वनडेच्या इतिहासात सर्वाधिक स्कोअर ठरला आहे.