माजी क्रिकेटपटू अजित आगरकरचा इशारा

पीटीआय, नवी दिल्ली

इंग्लंडमधील अनुकूल खेळपट्टय़ा आणि वातावरणात न्यूझीलंडचा वेगवान मारा भारतासाठी आव्हानात्मक ठरेल, असा इशारा भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने दिला आहे. साऊदम्पटन येथे १८ ते २२ जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना रंगणार आहे. यानिमित्ताने विश्लेषण करताना आगरकर म्हणाला, ‘‘न्यूझीलंडकडे वैविध्यपूर्ण वेगवान मारा आहे. यात ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी, नील वॅगनर यांचा समावेश आहे. कायले जॅमीसनसारख्या उंच गोलंदाजाचा सामना करणे कठीण जाते. इंग्लंडमधील वातावरण हेसुद्धा न्यूझीलंडसाठी अनुकूल आहे.’’

‘‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर गेल्या काही महिन्यांत भारतीय संघ कसोटी सामना खेळलेला नाही. आता इंग्लंडमधील आव्हान पूर्णत: वेगळे असेल. त्यामुळे या सामन्यासाठीची तयारी मला महत्त्वाची वाटते,’’ असे आगरकरने सांगितले.