वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडीच्या पुनरागमनामुळे आत्मविश्वास उंचावलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ बुधवारी न्यूझीलंडला नमवून २०१५च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीमधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी उत्सुक आहे. तसेच न्यूझीलंडचे विश्वचषक गुणतालिकेतील अग्रस्थान प्राप्त करण्याचे लक्ष्य आहे.

मागील विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडकडून धक्कादायक पराभव पत्करला होता. यंदाच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेची कामगिरी खराब होत आहे. पहिले तीन सलग सामने गमावल्यानंतर चौथा सामना पावसामुळे वाया गेला. त्यानंतर पाचव्या सामन्यात गुणतालिकेतील तळाच्या अफगाणिस्तानला हरवून आफ्रिकेला पहिलावहिला विजय साकारता आला. सलामीवीर हशिम अमला आणि क्विंटन डी’कॉकचा उत्तम समन्वय झाल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

न्यूझीलंडचा संघ विश्वचषकात अद्याप अपराजित राहिला आहे. तीन विजय आणि भारताविरुद्धचा अनिकाली सामना या बळावर सात गुणांसह ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत. न्यूझीलंडची फलंदाजीची फळी अत्यंत सक्षम आहे.

एन्गिडीचे पुनरागमन

वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि एन्रिच नॉर्जेला झालेल्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीच्या माऱ्याला धक्के बसले होते. परंतु एन्गिडीची तंदुरुस्ती आणि इंग्लंड भूमीवरील ‘विजयदर्शन’ यामुळे आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिसचा आत्मविश्वास उंचावला आहे. आफ्रिकेच्या आव्हानाची धुरा अनुभवी फिरकी गोलंदाज इम्रान ताहीरवर अवलंबून आहे. ४० वर्षीय ताहीरने अनुक्रमे इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्धच्या सामन्यांत प्रत्येकी दोन बळी मिळवले आहेत.

मुन्रो, गप्टिलकडून अपेक्षा

कर्णधार केन विल्यम्सनने बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांविरुद्ध मिळवलेल्या विजयांत महत्त्वाची भूमिका बजावली. अनुभवी फलंदाज रॉस टेलरसुद्धा सातत्याने धावा करीत आहे. सलामीवीर कॉलिन मुन्रो आणि मार्टिन गप्टिल यांनीसुद्धा जबाबदारीने फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय न्यूझीलंडकडे जिमी नीशाम आणि कॉलिन डी ग्रँडहोम असे दोन धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू आहेत.

सामना क्र. २५

न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका

स्थळ : एजबॅस्टन क्रिकेट ग्राऊंड, बर्मिगहॅम

सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २,

स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १

संघ

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), रॉस टेलर, मार्टिन गप्तिल, कॉलिन मन्रो, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), कॉलिन डी’ग्रँडहोम, जेम्स निशाम, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, मिचेल सँटनर, इश सोधी, टॉम ब्लंडेल, लॉकी फग्र्युसन, हेन्री निकोल्स.

दक्षिण आफ्रिका : फॅफ डय़ू  प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, क्विंटन डी’कॉक (यष्टीरक्षक), जेपी डय़ुमिनी, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, लुंगी एन्गिडी, ब्युरन हेंड्रिक्स, कॅगिसो रबाडा, इम्रान ताहिर, ताबारेझ शम्सी, अँडीले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, व्हॅन डर डुसेन.

आमनेसामने

एकदिवसीय     

सामने : ७०, दक्षिण आफ्रिका : ४१, न्यूझीलंड : २४, टाय / रद्द : ५

विश्वचषकात    

सामने : २, दक्षिण आफ्रिका : ०, न्यूझीलंड : २, टाय / रद्द : ०