२०१७ साली इंग्लंडमध्ये पार पडलेल्या महिला विश्वचषकात भारतीय महिलांनी अंतिम फेरीत धडक मारली होती. या कामगिरीनंतर भारतात महिला आयपीएल सुरु करण्याच्या मागणीने जोर धरला होता. त्याची चाचपणी करण्यासाठी बीसीसीआयने प्ले-ऑफ सामन्यांच्या आधी २२ मे रोजी महिला खेळाडूंचा एक प्रदर्शनीय टी-२० सामना आयोजित केला आहे. या सामन्यासाठी संघांची घोषणाही करण्यात आली आहे, भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मंधाना आणि धडाकेबाज फलंदाज हरमनप्रीत कौर यांच्याकडे कर्णधारपद सोपावण्यात आलं आहे. या सामन्यानंतर महिला आयपीएलबाबत गांभीर्याने विचार केला जाईल.

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका या संघातील महिला खेळाडूही या प्रदर्शनीय सामन्यात सहभागी होणार आहेत. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार आहे. आयपीएल पूर्वीप्रमाणेच सुरू राहिल, आमचा प्रयत्न महिला खेळाडूंसाठीही अशाच प्रकारची स्पर्धा आयोजित करण्याचा आहे अशी माहिती आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिली.

गेल्या दहा वर्षांमध्ये आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमीअर लिग स्पर्धेने क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आयपीएलच्या सामन्यांना मिळणारी प्रसिद्धी पाहता, बीसीसीआय आगामी ३ वर्षांमध्ये महिला आयपीएल सुरु करण्याच्या विचारात आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी यासंदर्भातले संकेत दिले आहेत. “आगामी २-३ वर्षांमध्ये आम्ही महिला आयपीएलचं आयोजन करण्याच्या विचारात आहोत”, मात्र यासंदर्भात अधिक कोणतीही माहिती माहिती राय यांनी प्रसारमाध्यांना दिली नाहीये.