राष्ट्रीय औद्योगिक कबड्डी स्पध्रेचे यजमानपद ठाण्याला
पुढील हंगामपासून पुरुष आणि महिलांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा स्वतंत्रपणे खेळवण्यात येणार आहे. २०१६मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात पुरुषांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा जोधपूर (राजस्थान) येथे होणार आहेत, तर महिलांची स्पर्धा पाटणा (बिहार) येथे होणार आहे. याचप्रमाणे एप्रिल महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय औद्योगिक कबड्डी स्पध्रेचे यजमानपद ठाण्याला सोपवण्यात आले आहे.
‘‘नुकतीच बंगळुरूला झालेली राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा सहा दिवसांची झाली होती. मात्र स्पध्रेचे आकारमान कमी करण्यासाठी आणि छोटय़ा शहरांनाही यजमानपदाची संधी मिळावी, यासाठी पुरुषांची आणि महिलांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा स्वतंत्रपणे खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा चार दिवसांची असेल. त्यामुळे यजमानांवर निवास, भोजन आदी व्यवस्थापनाचा ताण पडणार नाही,’’ असे भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे तांत्रिक संचालक ई. प्रसाद राव यांनी सांगितले.
‘‘गुवाहाटी येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेत (सॅफ) चार दिवस कबड्डी स्पर्धा असेल. मात्र या स्पध्रेच्या तारखा प्रो कबड्डी लीगदरम्यान असणार आहेत. परंतु आमचे पहिले प्राधान्य भारतीय संघाला असेल. भारताचे १२ खेळाडू प्रो कबड्डी लीगमध्ये काही दिवस नसतील,’’ अशी माहिती राव यांनी दिली.