18 September 2020

News Flash

बार्सिलोना उपांत्य फेरीत

बायर्न म्युनिच आणि बार्सिलोना या तगडय़ा संघांनी अपेक्षेनुसार खेळ करत चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या उपांत्य फेरीत ऐटीत प्रवेश केला.

| April 23, 2015 04:21 am

बायर्न म्युनिच आणि बार्सिलोना या तगडय़ा संघांनी अपेक्षेनुसार खेळ करत चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या उपांत्य फेरीत ऐटीत प्रवेश केला. म्युनिचने ६-१ अशा फरकाने पोर्टोवर , तर बार्सिलोनाने २-० अशा फरकाने पॅरिस सेंट जर्मन (पीएसजी) संघावर विजय मिळवला. म्युनिचच्या विजयात रॉबर्ट लेवांडोवस्की, तर बार्सिलोनाच्या विजयात नेयमारने महत्त्वाची भूमिका बजावली.
लेवांडोवस्कीने (२७ मि. व ४० मि.) पोटरे संघाविरुद्धच्या लढतीत पहिल्या सत्रातच हल्लाबोल केला. त्याने दोन अप्रतिम गोल नोंदवून मध्यंतरापर्यंत म्युनिचला ५-१ अशी दमदार आघाडी मिळवून दिली. या आघाडीत थिएगो अलसांटरा (१४ मि.), जे. बॉटेंग (२२ मि.) व थॉमस मुलर (३६ मि.) यांच्याही प्रत्येकी एक गोलचा वाटा आहे. या आघाडीने पोटरे संघाचे खच्चीकरण केले. २००४ च्या जेतेपदानंतर पहिल्यांदा अंतिम चारमध्ये धडक मारण्याचे पोटरे संघाचे स्वप्न म्युनिचच्या या आक्रमणाने भंगले. झाबी अलोन्सोने ८८व्या मिनिटाला गोल करून म्युनिचला ६-१ असा मोठा विजय मिळवून दिला. पोटरेकडून जॅक्सन मार्टिन याने ७३व्या मिनिटाला एकमेव गोल नोंदविला. म्युनिचने ७-४ अशा सरासरीच्या बळावर उपांत्य फेरीत धडक मारली. प्रशिक्षक पेप गॉर्डिलो यांच्या मार्गदर्शनाखाली म्युनिचने सलग सहा स्पर्धामध्ये उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा विक्रम केला.
दुसऱ्या सामन्यात नेयमारने पहिल्या सत्रात दोन गोल करून बार्सिलोनाचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. १४व्या मिनिटालाच नेयमारने पीएसजीच्या बचावपटूंना चकवा देत गोल करून बार्सिलोनाला आघाडी मिळवून दिली. ३४व्या मिनिटाला पुन्हा एकदा नेयमारचा करिष्मा पाहायला मिळाला आणि मध्यंतरापर्यंत बार्सिलोनाने २-० अशी मजबूत आघाडी घेतली होती. ती अखेपर्यंत कायम राखत बार्सिलोनाने उपांत्य फेरीत धडक मारली.

०७ चॅम्पियन्स लीगच्या गेल्या ८ सत्रांत सात वेळा बार्सिलोनाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
२७ थॉमस मुलरने चॅम्पियन्स लीग स्पध्रेत सर्वाधिक २७ गोल्स करणाऱ्या जर्मन खेळाडूचा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम मारिओ गोमेझच्या (२६) नावावर होता.

या सत्रातील कामगिरीवर मी खूश आहे. ध्येय गाठण्यासाठी आम्हाला अशीच सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची आवश्यकता आहे.
– नेयमार, बार्सिलोनाचा फुटबॉलपटू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 4:21 am

Web Title: neymar goal barcelona vs psg 2015 champions league
Next Stories
1 भारतीय पॅराऑलिम्पिक महासंघाची मान्यता रद्द
2 बॉक्सिंग इंडियामध्ये बंडाचे निशाण
3 कश्यप उप-उपांत्यपूर्व फेरीत
Just Now!
X