चॅम्पियन्स लीगमधील अंतिम १६ जणांमधील मॅँचेस्टर युनायटेडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांना पॅरिस सेंट जर्मेनचा खेळाडू नेयमारला खेळता येणार नाही. दुखापतीमुळे नेयमारला किमान १० आठवडे बाहेर राहावे लागणार आहे.

नेयमारवर शस्त्रक्रिया केली जाणार नाही. त्यामुळे त्याला बरा होण्यासाठी जास्त कालावधी लागणार आहे. पॅरिस सेंट जर्मेनने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले तर एप्रिल महिन्यात होणाऱ्या या लढतीसाठी नेयमार पुनरागमन करू शकेल.

‘‘तज्ज्ञांनी नेयमारच्या दुखापतीची पाहणी केल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राझीलच्या या खेळाडूनेही त्यांचा निर्णय मान्य केला आहे. त्यामुळे १० आठवडय़ांच्या कालावधीनंतर नेयमारला पुनरागमन करता येणार आहे,’’ असे पॅरिस सेंट जर्मेन क्लबकडून सांगण्यात आले.

मँचेस्टर युनायटेडविरुद्धचा पहिला सामना १२ फेब्रुवारी रोजी ओल्ड ट्रॅफर्ड येथे तर परतीचा सामना ६ मार्च रोजी खेळवला जाणार आहे.