25 January 2021

News Flash

पॅरिस सेंट-जर्मेनला नेयमारमुळे विजेतेपद

सेंट-जर्मेनने १०व्यांदा हा करंडक उंचावला.

(संग्रहित छायाचित्र)

चॅम्पियन्स करंडक फुटबॉल स्पर्धा

पायाच्या दुखापतीमुळे सलग पाच सामन्यांना मुकणाऱ्या ब्राझिलच्या नामांकित खेळाडू नेयमारने बदली खेळाडू म्हणून साकारलेल्या निर्णायक गोलच्या बळावर पॅरिस सेंट-जर्मेनने (पीएसजी) चॅम्पियन्स करंडक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावताना मार्सिले संघाला २-१ असे पराभूत केले.

लीग १ आणि फ्रेंच चषक या फ्रान्समधील दोन स्पर्धाच्या विजेत्यांमध्ये दरवर्षी चॅम्पियन्स करंडकाची अंतिम फेरी रंगते. यंदा पुन्हा एकदा या करंडकावर फ्रेंच चषकाचे विजेते सेंट-जर्मेन यांनीच मोहोर उमटवली. सेंट-जर्मेनने १०व्यांदा हा करंडक उंचावला.

मॉरो इकार्डीने ३९व्या मिनिटाला पहिला गोल झळकावून सेंट-जर्मेनला मध्यंतरापूर्वी १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ६५व्या मिनिटाला नेयमारला बदली खेळाडू म्हणून पाठवण्यात आले. मग ८५व्या मिनिटाला पेनल्टी मिळाल्यामुळे नेयमारने दुसरा गोल झळकावून संघाचा विजय सुनिश्चित केला.

युव्हेंटसच्या विजयात रोनाल्डोचे योगदान

सेरी-ए लीग फुटबॉल

तुरिन : ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या एका गोलला अन्य दोघांच्या गोलची उत्तम साथ लाभल्याने युव्हेंटसने सेरी-ए लीग फुटबॉलमध्ये सासुओलो संघाला ३-१ अशी धूळ चारली. या विजयासह युव्हेंटसने (१६ सामन्यांत ३३ गुण) गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले. डॅनिलो (५०वे मिनिट), आरोन रामसे (८२) आणि रोनाल्डो (९०+२) यांनी युव्हेंटससाठी गोल केले.

बार्सिलोना अंतिम फेरीत

स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल

कॉडरेबा (स्पेन) : स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या उपांत्य सामन्यात बार्सिलोनाने रेयाल सोशियादचा ४-३ असा पराभव केला. बार्सिलोनासाठी फ्रँक डी जाँगने (३९वे मिनिट) पहिला गोल केला, तर मिकेल ओयरझाबेलने (५१) सोशियादला बरोबरी साधून दिली. मग दोन्ही संघांनी गोल न केल्यामुळे लढतीचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला.

मँचेस्टरची विजयी घोडदौड

इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल

लंडन : मँचेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये सलग चौथ्या विजयाची नोंद करताना ब्रायटनला १-० असे नमवले. २० वर्षीय फिल फोडेनने ४४व्या मिनिटाला साकारलेला एकमेव गोल सिटीच्या विजयात मोलाचा ठरला. याबरोबरीच सिटीने (१६ सामन्यांत ३२ गुण) गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले. अन्य लढतीत टॉटेनहॅमने फुलहॅमला १-१ असे बरोबरीत रोखले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 12:09 am

Web Title: neymar wins paris saint germain abn 97
Next Stories
1 जसप्रीत बुमराह ब्रिस्बेन कसोटीत खेळणार की नाही? कोच विक्रम राठोड म्हणतात….
2 मोहम्मद अझरूद्दीनचं दमदार शतक; सचिनच्या साथीने मिळवून दिला विजय
3 IND vs AUS: स्मिथच्या बचावासाठी प्रशिक्षक लँगर मैदानात, म्हणाले…
Just Now!
X