ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाने विजयासाठी दिलेलं १३२ धावांचं आव्हान न्यूझीलंडने ७ गडी राखत पूर्ण केलं. भारतीय फलंदाज या मालिकेत सपशेल अपयशी ठरले. विशेषकरुन कर्णधार विराट कोहलीला या न्यूझीलंड दौऱ्यात एका अर्धशतकाचा अपवाद वगळता फारशी उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. कसोटी मालिकेत न्यूझीलंडच्या फलंदाजांनी विराटच्या खेळाचा अभ्यास करत त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं.

न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्टने विराट कोहलीच्या खेळाबद्दल एक निरीक्षण नोंदवलं. “विराट हा जगातला सर्वोत्तम फलंदाज आहे, यात काही वादच नाही. याच कारणामुळे आम्ही सुरुवातीपासून त्याच्यावर दबाव ठेवत होतो. विराट ज्या चेंडूवर चौकार मारतो ते चेंडू आम्ही कमी टाकले, आणि या दबावाखाली त्याने चुका केल्या. आम्ही ठरवल्याप्रमाणे योग्य टप्प्यावर मारा करत विराटला पायचीत केलं याचा मला आनंद आहे.” दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर बोल्ट पत्रकारांशी संवाद साधत होता.

अवश्य वाचा – Ind vs NZ : परदेशात चालत नाही विराट कोहलीची जादू, आकडेवारीच देतेय साक्ष

भारताचा दुसरा डाव डाव १२४ धावांत गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडला विजयासाठी १३२ धावांचं आव्हान मिळालं. या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत न्यूझीलंडने एकही गडी न गमावता ४६ धावांपर्यंत मजल मारली. उपहाराच्या सत्रानंतरही खेळपट्टीवर जम बसवलेल्या लॅथम आणि ब्लंडल जोडीने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत धावफलक हलता ठेवला. यादरम्यान लॅथमने आपलं अर्धशतकही साजरं केलं. अखेरीस १०३ धावांवर उमेश यादवने लॅथमला यष्टीरक्षक पंतकरवी झेलबाद केलं. लॅथमने ५२ धावा केल्या. यानंतर जसप्रीत बुमराहने बाऊंसर चेंडू टाकत कर्णधार विल्यमसनला आपल्या जाळ्यात अडकवलं. यानंतर टॉम ब्लंडलने आपलं अर्धशतक झळकावत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडलं. मात्र ५५ धावांवर खेळत असताना जसप्रीत बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर अनुभवी रॉस टेलर आणि हेन्री निकोल्स यांनी न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दुसऱ्या डावात भारताकडून बुमराहने २ तर उमेश यादवने १ बळी घेतला.

अवश्य वाचा – Ind vs NZ : कोणालाही दोष द्यायचा नाही; फलंदाजांच्या खराब कामगिरीवर बुमराहचं मत