मर्सिडिझचा ड्रायव्हर निको रोसबर्गने पुन्हा एकदा सुरेख कामगिरी करत मायदेशात रंगणाऱ्या जर्मन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीसाठी पोल पोझिशन मिळवली आहे. त्याचा सहकारी आणि ड्रायव्हर्स अजिंक्यपद शर्यतीतील प्रतिस्पर्धी लुइस हॅमिल्टनला मात्र तांत्रिक बिघाडामुळे सराव शर्यतीतून माघार घ्यावी लागली.
ब्रेकमध्ये बिघाड झाल्यामुळे हॅमिल्टनची कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी कुंपणावर जाऊन आदळली. पहिली सराव शर्यत संपण्याआधी हा प्रकार घडल्यामुळे हॅमिल्टनला पुढील शर्यतीत भाग घेता आला नाही. त्यामुळे रविवारी होणाऱ्या मुख्य शर्यतीसाठी हॅमिल्टनला १५व्या क्रमांकावरून सुरुवात करावी लागेल. रोसबर्गने जर्मन ग्रां. प्रि. शर्यतीसाठी पहिल्यांदा पोल पोझिशन मिळवली आहे. त्याने तिन्ही सराव शर्यतीत वेगवान लॅप नोंदवत अग्रस्थान पटकावले. गेल्या पाच शर्यतींमधील त्याची ही चौथी पोल पोझिशन ठरली. विल्यम्सच्या वाल्टेरी बोट्टासने दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली. त्याचा सहकारी फेलिपे मासा तिसरा आला.
मॅकलॅरेनच्या केव्हिन मॅग्नूसेन याने चौथे स्थान प्राप्त केले. रेड बुलचे ड्रायव्हर डॅनियल रिकार्डियो आणि सेबॅस्टियन वेटेल अनुक्रमे पाचवे आणि सहावे आले. फेरारीच्या फर्नाडो अलोन्सोला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. टोरो रोस्सोच्या डॅनिय क्वायटने आठवा क्रमांक पटकावला. सहारा फोर्स इंडियाच्या निको हल्केनबर्ग आणि सर्जिओ पेरेझ यांनी अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर झेप घेतली.