लुईस हॅमिल्टनच्या सततच्या उपरोधिक टिप्पणीने डिवचलेल्या निको रोसबर्गने रविवारी मध्यरात्री झालेल्या मेक्सिकन ग्रा. प्रि. फॉम्र्युला वन शर्यतीत जेतेपद पटकावले. तब्बल २३ वर्षांनंतर पहिल्यांदाच मेक्सिकोला शर्यतीच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. मर्सिडीजच्या रोसबर्गने एक तास ४२ मिनिटे व ३५.०३८ सेकंदाची वेळ नोंदवली. संघ सहकारी हॅमिल्टनला १.९५४ सेकंदानंतर शर्यत पूर्ण केल्यामुळे दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. विलियम्स संघाच्या व्हॅल्टेरी बोट्टासने तृतीय स्थान मिळवले.
या शर्यतीपूर्वी हॅमिल्टनने, आपण रोसबर्गला कोणत्याही प्रकारची मदत करणार नसल्याचे सांगितले होते. त्याच्या या खोचक वक्तव्यामुळे रोसबर्गने सराव शर्यतीत जोरदार मुसंडी मारून मुख्य शर्यतीत अव्वल स्थान पटकावले. मुख्य शर्यतीत रोसबर्गने १३ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने अखेपर्यंत अव्वल स्थान पटकावून हॅमिल्टनना सडेतोड उत्तर दिले. या पराभवामुळे हॅमिल्टनची विजयी मालिका खंडित केली.
रोसबर्गचे यंदाच्या सत्रातील हे चौथे, तर कारकिर्दीत एकूण १२वे जेतेपद आहे. ‘‘आजचा दिवस विस्मयकारक होता. लुईसने कडवी टक्कर दिली. या विजयाने मला अत्यानंद झाला आहे,’’ अशी प्रतिक्रिया रोसबर्गने दिली.

फोर्स इंडियाला दहा गुण
निको हल्केनबर्ग आणि सेर्गिओ पेरेज या फोर्स इंडियाच्या शर्यतपटूंनी मेक्सिकन ग्रा. प्रि. शर्यतीत अनुक्रमे सातवे व आठवे स्थान पटकावून दहा गुणांची कमाई केली. या दहा गुणांमध्ये फोर्स इंडियाने संघांच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर मजबूत पकड बनवली आहे. त्यांच्या खात्यात ११२ गुण जमा झाले असून सहाव्या स्थानावर असलेल्या लोटसकडे ७१ गुण आहेत. ‘‘संघ म्हणून आम्ही सर्वोत्तम कामगिरी केली,’’ असे मत संघ मालक विजय मल्ल्या यांनी व्यक्त केले.