अबू धाबी शर्यतीत हॅमिल्टनची बाजी

अटीतटीच्या शर्यतीनंतर मर्सिडीज संघाच्या निको रोसबर्गने फॉम्र्युला वन विश्वविजेतेपदाची कमाई केली. वर्षांतील शेवटच्या अबू धाबी शर्यतीत रोसबर्गचा सहकारी लुइस हॅमिल्टनने बाजी मारली. मात्र सरस गुणांच्या बळावर रोसबर्गने सर्वसाधारण जेतेपदावर नाव कोरले.  पहिल्यांदाच रोसबर्गने विश्वविजेतेपदावर मोहर उमटवली आहे.

[jwplayer uKgm2S1B]

एकाच संघाचे सदस्य असूनही हॅमिल्टनने रोसबर्गच्या विश्वविजेतेपदाच्या वाटचालीत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हॅमिल्टनने जाणीवपूर्वक स्वत:चा वेग मंदावला. जेणेकरून अन्य शर्यतपटूंनी आगेकूच करत रोसबर्गसमोर कडवे आव्हान निर्माण केले. रोसबर्गने द्वितीय स्थान पटकावले. मात्र अव्वल तीनमधून रोसबर्गची घसरण झाली असती तर विश्वविजेतेपदाचा मानकरी बदलण्याची शक्यता होती. हॅमिल्टनच्या नकारात्मक डावपेचांमुळे सेबॅस्टियन व्हेटेल रोसबर्गचे द्वितीय स्थान हिरावून घेण्याच्या बेतात होता. मात्र रोसबर्गने एकाग्रता ढळू न देता शर्यत पूर्ण केली. द्वितीय स्थानसह शर्यत पूर्ण करताच रोसबर्गने विश्वविजेतपदाचा आनंद साजरा केला.

‘माझे लहानपणापासूनचे स्वप्न पूर्ण झाले. कारकीर्दीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या प्रत्येकाचे मनपूर्वक आभार’, अशा शब्दांत रोसबर्गने आपल्या भावना व्यक्त केल्या. अबू धाबी शर्यतीपूर्वी गुणतालिकेत रोसबर्ग हॅमिल्टनपेक्षा १२ गुणांनी आघाडीवर होता. विश्वविजेतेपदासाठी त्याला अबू धाबी शर्यतीत अव्वल तीनमध्ये स्थान पटकावणे अनिवार्य होते. निकोचे वडील केके रोसबर्ग यांनी १९८२ मध्ये विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते. ३४ वर्षांनंतर निकोने वडलांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

[jwplayer 1G6YlsuX]