भारताने निदहास चषक तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने बांगलादेशवर १७ धावांनी मात केली. शुक्रवारी बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील विजेत्याशी भारत रविवारी अंतिम फेरीत दोन हात करणार आहे. भारताने रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैनाच्या फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेशसमोर १७७ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीसमोर बांगलादेशी फलंदाजांची डाळ शिजु शकली नाही. मुश्फिकुर रहिम आणि शब्बीर रेहमान यांच्यातील झालेल्या भागीदारीचा अपवाद वगळता बांगलादेशी फलंदाज खेळपट्टीवर जास्त काळ तग धरु शकले नाहीत. ज्याचा फायदा घेत भारतीय गोलंदाजांनी सामन्यात आपला विजय निश्चीत केला.

भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सामन्यात ३ बळी घेतले. बांगलादेशच्या महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडण्याची महत्वाची कामगिरी वॉशिंग्टन सुंदरने बजावली. फलंदाजीत रोहित शर्माने केलेल्या ८९ धावांच्या खेळीला सामन्याच्या अखेरीस सामनावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं. त्यामुळे श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यात कोण बाजी मारतं आणि अंतिम फेरीत भारताची गाठ कोणासोबत पडते याकडे सर्व क्रीडा रसिकांचं लक्ष लागलेलं असणार आहे.

 

  • भारताची बांगलादेशवर १७ धावांनी मात, तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत प्रवेश
  • अखेरच्या षटकात फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नान मेहदी हसन बाद, बांगलादेशचा सहावा गडी माघारी
  • शार्दुल ठाकूरचा १९ व्या षटकात टिच्चून मारा
  • मुश्फिकुर रहिमचं अर्धशतक, बांगलादेशची झुंज सुरुच
  • शार्दुल ठाकूरने शब्बीर रेहमानचा त्रिफळा उडवत दिला बांगलादेशला पाचवा धक्का
  • दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी
  • मुश्फिकुर रहिम आणि शब्बीर रेहमान जोडीने बांगलादेशचा डाव सावरला
  • बांगलादेशच्या डावाची घसरगुंडी सुरुच, चौथा गडी माघारी
  • युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलकडे झेल देत मेहमदुला माघारी
  • कर्णधार मेहमदुलाकडून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न
  • बांगलादेशचा तिसरा गडी माघारी, वॉशिंग्टन सुंदरचे आतापर्यंत सामन्यात ३ बळी
  • मात्र वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात इक्बाल त्रिफळाचीत
  • तमिम इक्बालकडून बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • बांगलादेशचा दुसरा गडी माघारी
  • ठराविक अंतराने सौम्या सरकार वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत
  • यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचा टी-२० क्रिकेटमधला ५० वा यष्टीचित बळी
  • मात्र वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर लिंटन दास यष्टीचित, बांगलादेशला पहिला धक्का
  • बांगलादेशी सलामीवीर लिंटन दास, तमिम इक्बालकडून डावाची आक्रमक सुरुवात
  • २० षटकांत भारताची धावसंख्या १७६/३, बांगलादेशला विजयासाठी १७७ धावांचं आव्हान
  • अखेरच्या चेंडूवर रोहित शर्मा धावबाद, सामन्यात शतकाची संधी हुकली
  • रुबेल हुसेनच्या गोलंदाजीवर रैना झेलबाद, भारताला दुसरा धक्का
  • अखेर शेवटच्या षटकात सुरेश रैना माघारी
  • रैना-रोहित शर्माच्या फटकेबाजीपुढे बांगलादेशी गोलंदाज हतबल
  • दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी
  • सुरेश रैना – रोहित शर्मा जोडीकडून फटकेबाजी सुरुच
  • सलग अपयशी कामगिरीनंतर रोहितचं बांगलादेशविरुद्ध अर्धशतक
  • कर्णधार रोहित शर्माला अखेर सूर गवसला, बांगलादेशच्या गोलंदाजीचा नेटाने सामना
  • रुबेल हुसेनने भारताची जमलेली जोडी फोडली, शिखर धवन त्रिफळाचीत. भारताला पहिला धक्का
  • पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी
  • रोहित शर्मा – शिखर धवनची चौफेर फटकेबाजी
  • भारतीय सलामीवीरांची आक्रमक सुरुवात
  • बांगलादेशच्या संघात तस्कीन अहमद ऐवजी अबु हैदरचा समावेश
  • भारतीय संघात एकमेव बदल, जयदेव उनाडकटच्या जागी मोहम्मद सिराजला संधी
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय