निदहास चषकातील श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यात खेळाडूंमध्ये झालेल्या वादावादीत बांगलादेशी संघाच्या ड्रेसिंग रुमचा दरवाजा तोडण्याची घटना घडली होती. श्रीलंकन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार बांगलादेशचा खेळाडू शाकीब अल हसन या प्रकरणामागे असल्याचं समोर येत आहे.

निदहास चषक तिरंगी मालिकेत भारताने अंतिम फेरीत बांगलादेशवर मात केली. मात्र त्याआधी झालेल्या सामन्यात बांगलादेशने यजमान श्रीलंकेवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या सामन्यात बांगलादेश आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये झालेली वादावादी क्रीडा रसिकांच्या चांगलीच लक्षात राहिली. नो-बॉलचा निर्णय न पटल्यामुळे बांगलादेशी खेळाडूंनी नाराजी व्यक्त करत मैदान सोडलं होतं. यात काही खेळाडूंची श्रीलंकन खेळाडूंशी हमरातुमरीही झाली होती. या हमरातुमरीचे पडसाद सामन्यानंतरही उमटलेले पहायला मिळाले. बांगलादेशी ड्रेसिंग रुमचा दरवाजा तोडण्याचा प्रकारही घडला.

श्रीलंकेवर मात करुन बांगलादेशने सामन्यात विजय मिळवला असला तरीही त्यांच्या या वर्तनावर सर्व बाजूंनी टीकेची झोड उठली. क्रीडा रसिकांनी सोशल मीडियावर बांगलादेशी संघाला चांगलच ट्रोल केलं. आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी या प्रकरणात चौकशी करत बांगलादेशी संघाच्या मानधनातली २५ टक्के रक्कम कापून घेतली. ड्रेसिंग रुमचा दरवाजा कोणी तोडला हे तपासण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. यानंतर ख्रिस ब्रॉड यांनी ड्रेसिंग रुममधल्या कर्मचारी वर्गाकडे चौकशी केला असता त्यांनी शाकीब अल हसनने दरवाज्याची तोडफोड केल्याचं म्हटलंय. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या साक्षीनुसार शाकीब अल हसनने रागाच्या भरात दरवाजा जोरात ढकलल्यामुळे दरवाज्याची काच तुटल्याचं समोर येतंय.