कुशल परेराच्या आक्रमक ६६ धावा आणि मधल्या फळीतल्या फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर निधास चषकातील पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला आहे. भारताने दिलेलं १७५ धावांचं आव्हान श्रीलंकेने ५ गडी राखून पूर्ण केलं. महत्वाच्या खेळाडूंशिवाय मैदानात उतरलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पुरती निराशा केली. शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट या सर्व गोलंदाजांवर श्रीलंकेच्या फलंदाजांनी हल्ला चढवला. कुशल परेराने शार्दुल ठाकूरच्या एका षटकात तब्बल २७ धावा कुटत त्याची लय बिघडवून टाकली. जयदेव उनाडकटला सामन्यात बळी मिळाला असला तरीही त्यालाही श्रीलंकन फलंदाजांच्या फटकेबाजीला सामोरं जावं लागलं.

भारताकडून फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २-२ बळी घेत किफायतशीर गोलंदाजी केली. या तिरंगी मालिकेत भारताला पुढचा सामना ८ तारखेला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

  • पहिल्या सामन्यात ५ गडी राखून श्रीलंकेचा विजय
  • दसुन शनका आणि थिसारा परेरा जोडीने विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांची औपचारिकता पूर्ण केली
  • उपुल थरंगा चहलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत, श्रीलंकेचा निम्मा संघ माघारी
  • अखेर वॉशिंग्टन सुंदरला कुशल परेराला माघारी धाडण्यात यश, १३ व्या षटकात परेरा यष्टीचीत
  • श्रीलंकेने ओलांडला १०० धावसंख्येचा टप्पा
  • अखेर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर कर्णधार चंडीमल माघारी, श्रीलंकेला तिसरा धक्का
  • कर्णधार दिनेश चंडीमलची परेराला चांगली साथ, दोघांमध्ये २८ धावांची भागीदारी
  • एका बाजूने कुशल परेराची झुंज सुरुच, भारतीय गोलंदाजीचा सामना करत झळकावलं आक्रमक अर्धशतक
  • अखेर गुणतिलकाला माघारी धाडण्यात उनाडकटला यश, श्रीलंकेला दुसरा धक्का
  • कुशल परेराची फटकेबाजी सुरुच, जयदेव उनाडकटच्या षटकातही जोरदार फटकेबाजी
  • शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर पेरेराची फटकेबाजी, एकाच षटकात कुटल्या २७ धावा
  • वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर शिखर धवनने पकडला झेल
  • मात्र दुसऱ्याच षटकात श्रीलंकेला पहिला धक्का, कुशल मेंडीस माघारी
  • पहिल्याच षटकात श्रीलंकन सलामीवीरांकडून डावाची आक्रमक सुरुवात
  • श्रीलंकेला सामना जिंकण्यासाठी १७५ धावांचं आव्हान
  • भारताकडून २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १७४ धावा
  • शिखर धवनचं शतक हुकलं, गुणतिलकाच्या गोलंदाजीवर ९० धावांवर धवन माघारी
  • जिवन मेंडीसने भारताची जमलेली जोडी फोडली, मनिष पांडे माघारी
  • मनिष पांडे – शिखर धवन जोडीमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी
  • सलामीवीर शिखर धवनचं अर्धशतक, भारताचा डाव सावरला
  • भारताने ओलांडला ५० धावसंख्येचा टप्पा
  • शिखर धवन- मनिष पांडे जोडीने भारताचा डाव सावरला
  • ठराविक अंतराने सुरेश रैना फर्नांडोच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत, भारताला दुसरा धक्का
  • चमिराच्या गोलंदाजीवर मेंडीसने पकडला रोहीत शर्माचा झेल
  • भारताची अडखळती सुरुवात, कर्णधार रोहीत शर्मा भोपळाही न फोडता माघारी
  • नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
  • निधास चषकाच्या सामन्यांना सुरुवात, भारताकडून विजय शंकरचं पदार्पण