सलामीवीर शिखर धवनने सलग दुसऱ्या सामन्यात झळकावलेलं अर्धशतक; आणि त्याला सुरेश रैनाने दिलेली भक्कम साथ या जोरावर भारताने निधास चषकात आपला पहिला विजय मिळवला आहे. सलामीच्या सामन्यात यजमान श्रीलंकेकडून हार पत्करावी लागल्यानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात बांगलादेशवर ६ गडी राखून विजय मिळवला. शिखर धवन या विजयाचा खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरला. बांगलादेशने दिलेल्या १४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शिखरने तिसऱ्या विकेटसाठी सुरेश रैनासोबत ६८ धावांची भागीदारी केली. ही भागीदारीच या सामन्यात भारतासाठी निर्णायक ठरली. दरम्यान शिखरने लागोपाठ दुसऱ्या सामन्यामध्ये अर्धशतकी खेळी केली. बांगलादेशविरुद्ध खेळताना शिखरने ४३ चेंडूत ५५ धावा काढल्या. त्याच्या या खेळीत ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. शिखर धवन आणि सुरेश रैना माघारी परतल्यानंतर मनिष पांडे आणि दिनेश कार्तिक जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

बांगलादेशच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. कर्णधार रोहित शर्मा आणि ऋषभ पंतला झटपट बाद करुन भारताला धक्का देण्यात बांगलादेशचे गोलंदाज यशस्वीही झाले होते. मात्र शिखर धवन आणि सुरेश रैनाची जोडी वेळेत फोडणं बांगलादेशी गोलंदाजांना जमलं नाही. बांगलादेशकडून रुबेल हुसेनने २ तर तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमानने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

  • भारताची बांगलादेशवर ६ गडी राखून मात, निधास चषकात भारताचा पहिला विजय
  • विजयाची औपचारिकता मनिष पांडे – दिनेश कार्तिक जोडीकडून पूर्ण
  • भारताचा चौथा गडी माघारी, शिखर धवनची ५५ धावांची खेळी
  • अखेर शिखर धवन माघारी, तस्कीन अहमदच्या गोलंदाजीवर लिंटन दासकडे झेल देत माघारी
  • अखेर रुबेल हुसेनने भारताची जमलेली जोडी फोडली, सुरेश रैना माघारी. भारताला तिसरा धक्का
  • सलग दुसऱ्या सामन्यात शिखर धवनचं अर्धशतक
  • दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी, भारताने ओलांडला शंभर धावसंख्येचा टप्पा
  • सुरेश रैना – शिखर धवन जोडीने सावरला भारताचा डाव
  • रुबेल हुसेनने उडवला पंतचा त्रिफळा, भारताला दुसरा धक्का
  • दुसऱ्या बाजूने शिखर धवनची फटकेबाजी सुरुच, ऋषभ पंतची शिखर धवनला चांगली साथ
  • मुस्तफिजुर रहमानच्या गोलंदाजीवर कर्णधार रोहित त्रिफळाचीत, भारताला पहिला धक्का
  • भारतीय सलामीवीरांकडून डावाची सावध सुरुवात
  • बांगलादेशचा डाव १३९ धावांच आटोपला, भारतापुढे विजयासाठी १४० धावांचं आव्हान
  • रुबेल हुसेन धावचीत, बांगलादेशला आठवा धक्का
  • बांगलादेशचा सातवा गडी माघारी
  • अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याच्या नादात शब्बीर रेहमान उनाडकटच्या गोलंदाजीवर माघारी
  • ठराविक अंतराने जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीवर मेहदी हसन माघारी, बांगलादेशला सहावा धक्का
  • १०० धावसंख्येचा टप्पा ओलांडल्यानंतर बांगलादेशचा निम्मा संघ माघारी
  • मात्र लिंटन दासला माघारी धाडत चहलने बांगलादेशची जमलेली जोडी फोडली
  • दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी ३५ धावांची छोटेखानी भागीदारी
  • शब्बीर रेहमान आणि लिंटन दास जोडीने बांगलादेशडा डाव सावरला
  • विजय शंकरचा टिच्चून मारा, बांगलादेशचे ४ गडी माघारी
  • कर्णधार मेहमदुलाकडून निराशा, अवघी १ धाव काढून माघारी
  • विजय शंकरच्या  गोलंदाजीवर मुशफिकूर रहिम माघारी, बांगलादेशचा तिसरा गडी माघारी
  • मुशफिकूर रहिम आणि लिंटन दास जोडीकडून डाव सावरण्याचा प्रयत्न
  • बांगलादेशने ओलांडला ५० धावांचा टप्पा
  • दरम्यानच्या काळात भारतीय क्षेत्ररक्षकांनी बांगलादेशी फलंदाजांचे सोपे झेल टाकले
  • शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर तमिम इक्बाल माघारी, बांगलादेशचा दुसरा गडी माघारी
  • उनाडकच्या गोलंदाजीवर सौम्या सरकार माघारी, बांगलादेशला पहिला धक्का
  • बांगलादेशी सलामीवीरांकडून डावाची आक्रमक सुरुवात
  • भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय