निधास चषकातील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने श्रीलंकेवर  ६ गडी राखून विजय मिळवला आहे. अटीतटीच्या या सामान्यात सुरुवातीपासूनच भारताने श्रीलंकेच्या फलंदाजीवर नियंत्रण ठेवले. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात १९ षटकांचाच सामना झाला. नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थही ठरवला. नंतर फलंदाजी करताना भारतीय संघाने संथ सुरुवात केली. मात्र मनिष पांडे आणि दिनेश कार्तिक या दोघांच्या खेळीने भारताने श्रीलंकेवर सहजरित्या मात केली.

शार्दुल ठाकूर, विजय शंकर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी श्रीलंकेच्या फलंदाजांवर अंकुश लावत त्यांना मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. पहिल्या डावात शार्दुल ठाकूर हा भारतीय गोलंदाजीचा हिरो ठरला. शार्दुलने श्रीलंकेच्या ४ फलंदाजांना माघारी धाडलं. महत्वाची गोष्ट म्हणजे टी-२० सामन्यात अखेरच्या षटकात फलंदाज फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत असतानाही शार्दुलने लंकेच्या फलंदाजांना चांगलचं जखडून ठेवलं. भारतीय गोलंदाजांच्या या सुरेख कामगिरीमुळे श्रीलंकेचा संघ १९ षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात १५२ धावांपर्यंत मजल मारु शकला. मात्र भारताने हे आव्हान लिलया पेलत ६ गडी राखून श्रीलंकेवर विजय मिळवला. अवघ्या १७.३ शतकातच टार्गेट पूर्ण करून भारताने हा सामना खिशात घातला.

 

  • मनिष पांडेची ३१ चेंडूत ४२ धावांची खेळी भारतासाठी निर्णायक
  • १७. ३ शतकांमध्येच भारताने गाठले लक्ष्य
  • मनिष पांडे आणि दिनेश कार्तिक यांची एकेमेकांना उत्तम साथ
  • लोकेश राहुल हिट विकेट, भारताला चौथा धक्का
  • सुरेश रैना माघारी, भारताला तिसरा धक्का
  • अकिला धनंजयाचा सलग दुसऱ्या षटकात भारताला धक्का, शिखर धवनला धाडलं माघारी
  • भारताचा पहिला गडी माघारी, कुशल मेंडीसने पकडला रोहितचा झेल
  • मात्र रोहित शर्मा सलग तिसऱ्या सामन्यात अपयशी, अकिला धनंजयाच्या गोलंदाजीवर झेलबाद
  • भारतीय सलामीवीरांकडून डावाची आक्रमक सुरुवात
  • १९ षटकांत श्रीलंकेची १५२/९ धावसंख्येपर्यंत मजल, भारताला विजयासाठी १५३ धावांचं आव्हान
  • अखेरच्या षटकात शार्दुल ठाकूरला दोन बळी, दसुन शनका आणि दुषमंता चमीरा झेलबाद
  • अखेरच्या षटकांत लंकेने ओलांडला १५० धावसंख्येचा टप्पा
  • मात्र जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीवर धनंजया माघारी, लंकेला सातवा धक्का
  • दसुन शनका – अकिला धनंजया जोडीकडून अखेरच्या षटकांंमध्ये फटकेबाजी
  • पाठोपाठ अर्धशतकवीर कुशल मेंडीस चहलच्या गोलंदाजीवर बाद, लंकेचा सहावा गडी माघारी
  • जिवन मेंडीस वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर बाद, श्रीलंकेला पाचवा धक्का
  • श्रीलंकेचा चौथा गडी माघारी, चहलने पकडला श्रीलंकन कर्णधाराचा झेल
  • फटकेबाजी करण्याच्या नादात कर्णधार थिसारा परेरा बाद, शार्दुल ठाकूरला सामन्यात दुसरा बळी
  • कुशल मेंडीसची झुंज सुरु, भारतीय गोलंदाजीचा सामना करत झळकावलं अर्धशतक
  • श्रीलंकेचा तिसरा गडी माघारी, गुणतिलका – मेंडीसमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी
  • अखेर श्रीलंकेची जमलेली जोडी भारताने फोडली, उपुल थरंगा विजय शंकरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत
  • दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
  • गुणतिलका आणि उपुल थरंगा जोडीने लंकेचा डाव सावरला
  • दुसऱ्याच षटकात कुशल परेरा वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर माघारी, श्रीलंकेचा दुसरा गडी माघारी
  • रैनाने पकडला गुणतिलकाचा सुरेख झेल
  • शार्दुल ठाकूरने श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, गुणतिलका माघारी
  • जयदेव उनाडकर, वॉशिंग्टन सुंदरच्या षटकांमध्ये गुणतिलका – मेंडीसची फटकेबाजी
  • श्रीलंकन सलामीवीरांची आक्रमक सुरुवात
  • पावसामुळे सामना १९ षटकांचा होणार
  • ऋषभ पंतच्या जागी लोकेश राहुलला संघात जागा, दिनेश चंडीमलच्या अनुपस्थितीत लंकेचं नेतृत्व थिसारा परेराकडे
  • भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
  • पावसाचा जोर ओसरला, नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार मैदानात
  • पावसामुळे नाणेफेकीसाठी उशीर होणार
  • पावसाचा जोर ओसरला, दोन्ही पंच आणि सामनाधिकाऱ्यांकडून मैदानाची पाहणी
  • सामना सुरु होण्याआधी कोलंबोच्या मैदानात पावसाची हजेरी